Join us

वाहन क्रमांकामध्ये हेराफेरी; शून्यामुळे झाली भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 09:32 IST

अधिकाऱ्याच्या पत्नीला चालान; पोलिसांकडून बेड्या.

मुंबई : आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने पत्नीला घेतलेल्या दुचाकीवर चालान वाढले आणि त्यामागे झालेल्या शून्याच्या हेराफेरीची भंडाफोड झाली. एका महिलेनेच आयकर अधिकाऱ्याच्या पत्नीच्या वाहन क्रमांकाचा वापर करत, ही हेराफेरी केली होती. स्वतःच्या वाहन क्रमांकात ९ चा शून्य करत ही फसवणूक सुरू होती. 

आझाद मैदान वाहतूक चौकीत कार्यरत असलेले सहायक फौजदार सुनील दिगंबर मांजरेकर (वय ५६) यांच्या फिर्यादीनुसार, महिलेविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिनाळ नवीनभाई परीख (४२) या महिलेला अटक केली आहे. अँटॉप हिल परिसरात राहणारे संजय ठाकूर काटेकर यांनी त्यांची पत्नी कविता यांच्यासाठी २०१७ मध्ये दुचाकी विकत घेतली. कुठेही नियमांचे उल्लंघन केले नसताना त्यांना मुंबई पोलिसांचे वाहतुकीचे दंड भरण्याबाबत चालान येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला काही चालान भरलेदेखील.

लोकअदालतीची नोटीस आली आणि...

मात्र, लोकअदालतीची नोटीस आल्यानंतर मात्र त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आलेल्या चालानातील ठिकाणे आणि फोटोच्या आधारे त्यांनी महिलेचा शोध घेत, वाहतूक पोलिसांकडे मदत मागितली. कॉल येताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेने तेथून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला वाहतूक चौकीत आणून चौकशी केली.

छेडछाड, ३,८०० रुपयांचा वाहतूक दंड :

सीपी टँक परिसरात राहणारी महिला पिनाळ नवीनभाई परीख (४२) हिने वाहन क्रमांकात छेडछाड करून ही फसवणूक केल्याचे समोर आले. महिलेचा वाहन क्रमांक हा एमएच ०१ सीएस ११९८ होता. तसेच, या वाहनाचे मालक हे विशाल कांबळी असल्याचे समजते. संबंधित मालकास संपर्क केला, मात्र त्यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला नाही. महिलेने वाहन क्रमांकातील ९ ऐवजी शून्य करून हेराफेरी केली. त्यामुळे, ऑगस्ट २०२३ पासून काटेकर यांना ३,८०० रुपयांचा वाहतूक दंड भरावा लागला.

टॅग्स :मुंबईवाहतूक पोलीस