एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देणारी कुटुंबे

By admin | Published: July 29, 2016 03:41 AM2016-07-29T03:41:27+5:302016-07-29T03:41:27+5:30

आयुष्यभर पोलीस दलात काम करूनदेखील पोलिसांना निवृत्तीनंतर राहायला घर मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन काही पोलिसांनी एकत्र येत घाटकोपरमध्ये स्वत: इमारती बांधून

Families cooperating with each other | एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देणारी कुटुंबे

एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देणारी कुटुंबे

Next

मुंबई : आयुष्यभर पोलीस दलात काम करूनदेखील पोलिसांना निवृत्तीनंतर राहायला घर मिळत नाही, हीच बाब लक्षात घेऊन काही पोलिसांनी एकत्र येत घाटकोपरमध्ये स्वत: इमारती बांधून यामध्ये कुटुंबीयांसाठी निवारा मिळवला आहे. घाटकोपरमध्ये सध्या अशा ११ इमारती असून, यामध्ये सर्व पोलीस कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक रहिवाशाच्या सुख-दु:खात हे सर्व जण एकत्र येत असल्याने या ठिकाणी एका सोसायटीचे कुटुंबात रूपांतर झाले आहे.
घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीच्या मागील बाजूस घाटकोपर दक्षता पोलीस सहकारी गृहनिर्माण सोसायटी उभारण्यात आली आहे. सोसायटीमधील सर्व रहिवासी हे पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी असून, काही जण दलातून निवृत्त झालेले आहेत. गृहविभागाकडून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला राहण्यासाठी घर मिळते. मात्र, निवृत्तीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याने, अनेक पोलिसांना मुंबईमध्ये राहण्याची इच्छा असतानाही गावचा रस्ता धरावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन या सोसायटीमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी कायमस्वरूपी मुंबईत घर बांधण्याचे ठरवले. त्यानुसार, १९९५ दरम्यान घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीच्या पाठीमागील भूखंड पोलिसांनी शासनाकडून ९९ वर्षांच्या भाडे तत्त्वावर घेतला. तत्कालीन पोलीस उपायुक्त एस. कापसे यांनी वसाहतीच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिल्याचे सोसायटी सभासद सांगतात.
सोसायटीमध्ये एकूण ११ इमारती असून, यामध्ये ३८७ कुटुंबे वास्तव्यास आहेत. इमारतीमध्ये राहणारे बरेचसे रहिवासी हे पोलीस दलात असल्याने, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळच नसतो. अशा वेळेस एखाद्या कुटुंबामध्ये काही अपघात अथवा दु:खद घटना घडल्यास सोसायटीमधील सर्व जण एकत्र येत मदत करत असतात, तसेच एखाद्या रहिवाशाच्या घरी लग्नसमारंभ असल्यास सर्वजण एकत्रितपणे तयारीला लागतात. त्यामुळे या वसाहतीतील रहिवाशांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे, असे सोसायटीचे अध्यक्ष अशोक पालवे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव
वार्षिक परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सोसायटीमध्ये दरवर्षी गुणगौरव करण्यात येतो, तसेच त्यांना विविध बक्षिसेदेखील दिली जातात. याशिवाय मुलांना चांगले मार्गदर्शन मिळावे, यासाठी मार्गदर्शन शिबिर यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रहिवाशांसाठी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे कार्यक्रमही सोसायटी आयोजित करते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची वर्षभर रेलचेल
गेल्या अनेक वर्षांपासून या सोसायटीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सर्व रहिवासी या ठिकाणी एकत्र येऊन १० दिवस गणपतीची भक्तिभावाने पूजा करत असतात. अशाच प्रकारे महाशिवरात्रीचा कार्यक्रमदेखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येते, तसेच नवरात्रौत्सवामध्ये दांडियाचा कार्यक्रम रंगतो.

Web Title: Families cooperating with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.