कुटुंबाची मागणी; कोरोना टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी परवानगीसाठी पाठवले केंद्राला पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंथरुणाला खिळून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरोघरी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करावी, अशी मागणी ज्येष्ठांच्या कुटुंबीयांकडून जोर धरू लागली आहे. याविषयी, वैद्यकीय तज्ज्ञांना विचारले असताना त्यांनीही सकारात्कम प्रतिसाद दर्शविला आहे. राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी याबद्दल केंद्र सरकारला परवानगीसाठी पत्रही लिहिले आहे.
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, लसीकरण केंद्रावर येऊ न शकणारे, दुसऱ्यावर अवलंबून असणारे, दिव्यांग तसेच विविध व्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिक समाजात असून त्यांचे प्रमाण मोठे आहे. हा वर्ग लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशांसाठी घरोघरी लसीकरण सुरू करावे, यासाठी केंद्राकडे याविषयीच्या मान्यतेसाठी पत्र लिहिले आहे. मात्र अजून त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, हा निर्णय सकारात्मक असून यामुळे लसीकरण प्रक्रियेला गती मिळेल; शिवाय लसीकरणाचे उद्दिष्टही पूर्ण होण्यास मदत होईल. जगात ऑस्ट्रेलियात याबद्दल सर्वांत आधी निर्णय घेण्यात आला आहे.
मांटुगा येथे स्थायिक असणाऱ्या रामचंद्र यांनी सांगितले, माझी आई ६७ वर्षांची असून कोरोनाच्या काळात तीन महिने रुग्णालयात दाखल होती. आता तिला कोरोनाची लस द्यायची आहे, मात्र लसीकरण केंद्रांवरील गर्दी पाहता ते फारसे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे लसीकरण कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, आई फार अंतर चालू शकत नाही. याविषयी, वांद्रे-कुर्ला संकुल येथील कोरोना केंद्राच्या डॉक्टरांना विचारले होते, मात्र त्यांनी लसीकरण केंद्रावर आणण्याचा पर्याय दिला. या प्रक्रियेत संसर्गाचा धोकाही जाणवतो. त्यामुळे आता लसीकरण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
........................