चप्पल व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची उपासमार, चार महिन्यांपासून विक्री ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 07:16 AM2020-07-16T07:16:59+5:302020-07-16T07:17:06+5:30

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीमधील चपला बनविण्याचा व्यवसाय करणा-या कुटुंबांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

Families in the footwear business starve, sales stalled for four months | चप्पल व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची उपासमार, चार महिन्यांपासून विक्री ठप्प

चप्पल व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची उपासमार, चार महिन्यांपासून विक्री ठप्प

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. धारावीतील लघुउद्योजकांवर ज्याप्रमाणे कोरोनामुळे संकट ओढवले आहे, तशीच काहीशी परिस्थिती चेंबूरमधील चप्पल व्यवसायावर ओढावली आहे. चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीमधील चपला बनविण्याचा व्यवसाय करणाºया कुटुंबांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. मागील चार महिन्यात चपलांची विक्री पूर्णपणे थांबल्याने येथील कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हाताला काम नसल्याने येथील व्यवसायांमध्ये काम करणारे कामगारही आपापल्या गावी निघून गेले आहेत. चपला बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालही येथे पोहोचत नसल्यामुळे हे व्यावसायिक आता हाताला मिळेल ते काम करत आहेत.
ठक्कर बाप्पा परिसरात अनेक घरांमध्ये चप्पल बनविण्याचा व्यवसाय चालतो. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस राजस्थानातील अनेक कुटुंबे ठक्कर बाप्पा येथे स्थलांतरित झाले. तेव्हापासून ते चप्पल बनविण्याचा व्यवसाय करत आहेत. येथे सुमारे पाचशे कुटुंबे चप्पल बनवण्याचा व्यवसाय करतात. मुंबईसह भारतातील अनेक चपलांच्या दुकानांमध्ये ठक्कर बाप्पा येथे बनविलेल्या चपला विक्रीस ठेवलेल्या असतात. चप्पल विक्रेते येथून होलसेलच्या दरात चपला विकत घेऊन आपल्या दुकानात त्या विक्रीसाठी नेत असतात. परंतु कोरोनामुळे कोणताच चप्पल विक्रेता ठक्कर बाप्पा येथे फिरकला नाही, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अनेक व्यावसायिकांच्या डोक्यावर लाखोंचे कर्ज असल्यामुळे ते मानसिक तणावाखाली जगत आहेत. ज्या कुटुंबांचे त्यांच्या गावाला उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही, असे कुटुंब आता हाताला मिळेल ते काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरीही कच्च्या मालाची आवक बंद आहे. तसेच कामगार मुंबईत परत येण्याची तयारी दर्शवत नसल्यामुळे भविष्यात या व्यवसायाचे काय होणार, असा प्रश्न येथील व्यावसायिकांना सतावत आहे. चप्पल व्यावसायिकांच्या कुटुंबांवर प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी चप्पल व्यावसायिक करत आहेत.

- मुंबईसह भारतातील अनेक चपलांच्या दुकानांमध्ये ठक्कर बाप्पा येथे बनविलेल्या चपला विक्रीस ठेवलेल्या असतात. चप्पल विक्रेते येथून होलसेलच्या दरात चपला विकत घेऊन आपल्या दुकानात त्या विक्रीसाठी नेत असतात. परंतु कोरोनामुळे कोणताच चप्पल विक्रेता ठक्कर बाप्पा येथे फिरकला नाही.

Web Title: Families in the footwear business starve, sales stalled for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.