कुटुंब न्यायालयानेही साजरा केला ‘प्रेम दिन’; ब्रेकअपऐवजी खुलली कळी, अनोखे व्हॅलेंटाइन गिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:44 AM2018-02-15T05:44:44+5:302018-02-15T05:45:10+5:30
कुटुंब न्यायालये म्हणजे घटस्फोट मिळवण्याचे ठिकाण अशीच आत्तापर्यंतची ओळख. तथापि, मोडणारे संसार आज पुन्हा उभे राहिल्याचे चित्र ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त कुटुुंब न्यायालयात दिसून आले. तुटणारे संसार जुळल्याचा अनोखा योग १४ फेब्रुवारीला साधला गेला.
मुंबई : कुटुंब न्यायालये म्हणजे घटस्फोट मिळवण्याचे ठिकाण अशीच आत्तापर्यंतची ओळख. तथापि, मोडणारे संसार आज पुन्हा उभे राहिल्याचे चित्र ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त कुटुुंब न्यायालयात दिसून आले. तुटणारे संसार जुळल्याचा अनोखा योग १४ फेब्रुवारीला साधला गेला. विवाह तोडण्यासाठी धडपडणाºया जोडप्यांचा संसार पुन्हा थाटून देत त्यांचा सत्कार सोहळा कुटुंब न्यायालयाने आयोजित केला. आयुष्याची पुन्हा सुरूवात करण्यासाठी सज्ज असलेल्या २२ जोडप्यांना त्यांचेच रेखाचित्र देऊन न्यायालयाने त्यांना अनोखे ‘व्हॅलेंटाईन गिफ्ट’ही दिले़
व्हॅलेंटाइन म्हणजेच प्रेम दिन साजरा करण्यासाठी अनेक बहुचर्चित ठिकाणे आहेत़ अशा ठिकाणी प्रेम साजरे करणाºयांची गर्दीही होते़ तशीच काहीशी गर्दी विवाह मोडण्यासाठी कुटुंब न्यायालयात होते़ अशा या न्यायालयात बुधवारी प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी झाली़ विवाह मोडण्यासाठी एकमेकांविरुद्ध वाट्टेल ते आरोप करणारी जोडपी मध्यस्थांच्या (काउंसलर) व वकिलांच्या साहाय्याने पुन्हा एकत्र संसार करण्यासाठी तयार झाली़ अशा तब्बल २५०हून अधिक जोडप्यांना सत्कार सोहळ्याचे आमंत्रण होते़
ही जोडपी संपूर्ण महाराष्ट्रातील होती़ काही खासगी कारणास्तव केवळ ६६ जोडप्यांनी हे आमंत्रण स्वीकारले़ प्रत्यक्षात २२ जोडपी कार्यक्रमाला हजर झाली़ आंतरजातीय विवाह करून २६ वर्षे एकत्र संसार करणाºया एका जोडप्याने त्यांच्या सुखद संसाराचा अनुभव इतर जोडप्यांना सांगितला़ ‘ती सिंधी, तो ख्रिचन’, विवाहासाठी दोन्ही कुटुंबांचा नकार, तरीही विवाह झाला़ तिला त्याच्या घरात मानसन्मान नव्हता़ पण आता त्याच्या घरचे सर्वच महत्त्वाचे निर्णय ती घेते, हे त्याचे अभिमानाचे वाक्य़ या वाक्याने बसलेल्या जोडप्यांपैकी प्रत्येक मुलगी साथीदाराला असा आदर्श ठेवण्याचा सल्ला देत होती़
आंतरजातीय विवाह करणाºया दुसºया जोडप्याचा अनुभवही इतरांना आदर्श देणारा ठरला़ मुमताज शेख, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्त्व, त्यांचा दुसरा विवाह़ राहुल गवारे, हे त्यांचे जोडीदाऱ तेही सामाजिक कार्यात सतत पुढे़ गेली १२ वर्षे हे जोडपे सुखी संसार करत आहे़ मी कामात व्यस्त असलो की ती घर व मुलांना सांभाळते़ ती कामात व्यस्त असली की मी घर व मुलांना सांभाळतो़ आम्ही एकमेकांचे अस्तित्व कधीच पुसू दिले नाही़ आम्ही एकमेकांसाठी व स्वत:साठीही वेळ देतो, हा या जोडप्याचा अनुभव सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरला़
कुटुंब जोडणारे न्यायालय
याप्रसंगी अनेक जोडप्यांनी पुन्हा
एकत्र येण्याचे अनुभव कथन केले़ अशा प्रकारे हा अनोखा प्रेमाचा दिवस कुटुंब न्यायालयात साजरा झाला़ ‘कुटुंब तोडण्यासाठी नव्हे, तर कुटुंब जोडण्यासाठीचे न्यायालय’ असा मंत्र याद्वारे देण्यात आला़