कौटुंबिक कार्यक्रम, सुट्ट्यांमुळे पुन्हा कोरोनाचा फैलाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:05+5:302021-02-16T04:08:05+5:30
नियमांचे पालन करा, मास्क घाला; प्रशासनाचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात नियंत्रणात आलेला कोरोना ...
नियमांचे पालन करा, मास्क घाला; प्रशासनाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. कौटुंबिक सोहळे, सुटटया, गर्दीचे कार्यक्रम, वाढदिवस, लग्नसोहळे अशा अनेक गोष्टी यास कारणीभूत असल्याचे तर्कवितर्क लावले जात असून, कोरोनाला हरवायचे असेल तर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. सामाजिक अंतराचे नियम पाळावेत; अशा आशायाचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गणोशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या सणांवर बंधने घालण्यात आल्याने कोरोना मुंबईत नियंत्रित आला, असा दावा मुंबई महापालिकेने केला. शिवाय विविध उपाय योजना करण्यात आल्याने कोरोना नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. मात्र आता लॉकडाऊन शिथिल होत असताना लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली असतानाच कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषत: मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून, यावर उपाय म्हणून नागरिकांना सामाजिक अंतर पाळत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सर्वत्र गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. नागरिकांच्या प्रवासात भर पडू लागली आहे. सुट्ट्यांत फिरण्यासाठी नागरिक बाहेरगावी जाऊ लागले आहेत. मात्र या कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. परिणामी कोरोनाचा पुन्हा शिरकाव होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दिवसांत विमानसेवा आणि लोकल सेवेत भर पडली आहे. यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अनेक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यात सामाजिक अंतराचे नियम धुळीस मिळत आहेत. परिणामी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र जर का नागरिकांनी थोडी काळजी घेतली तर कोरोना नियंत्रित राहण्यास मदत होईल? असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
* काच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांचा इतिहास पाहिला तर त्यांनी कुठे ना कुठे प्रवास केला आहे किंवा त्यांनी गर्दीच्या कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेतला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याची नोंद होत आहे. मुलुंड, विक्रोळी, वांद्रे, खारसह लगतच्या परिसरात कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढत असून, आता खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------------