Mumbai Boat Accident : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटने बुधवारी जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. वेगात आलेल्या स्पीड बोटने धडक दिल्यानंतर बोट उलटली आणि हा अपघात झाला. या भीषण कुटुंबांत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातून फिरण्यासाठी मुंबईतल्या आलेले एक कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. १५ रुपयांच्या वडापावने अख्ख्या कुटुंबाला वाचवलं आहे.
गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात स्पीड बोटने नीलकमल या प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पावणेचारच्या दरम्यान नौदलाची स्पीडबोट प्रचंड वेगात येऊन आदळली आणि नीलकमल फेरी बोटीला धडकली. दरम्यान या अपघातात गोरखपूरमधील एक कुटुंब सुदैवाने बचावलं आहे. कुटुंबातील मुलांनी केलेल्या हट्टामुळे केलेल्या सर्वांचा जीव वाचला आहे.
नीलकमल बोटीमधून एलिफंटाला जाण्यासाठी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील अंजली त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंबीय गेटवे ऑफ इंडिया येथे आले होते. त्रिपाठी यांच्या कुटुंबाने या फेरीबोटची तिकीटं काढली होती. मात्र त्रिपाठी कुटुंबिय बोटीत चढण्याआधी कुटुंबातील चिमुकल्यांनी वडापाव खाण्याचा हट्ट धरला. मुलांच्या हट्टानंतर कुटुंबियांनीही वडापाव खाण्याचे ठरवले आणि तो खरेदी करण्यासाठी गेले. मात्र यामध्ये वेळ गेला आणि त्यांची फेरीबोट सुटली आणि त्रिपाठी कुटुंबातील कोणीच या बोटवर चढू शकलं नाही.
मुलांनी केलेल्या वडापावच्या हट्टामुळेच आमचं संपूर्ण कुटुंब या अपघातामधून बचावलं, असं अंजली त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. दुसरीकडे, या अपघातात नाशकातील एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. हे कुटुंब रुग्णालयातील उपचारानंतर फिरण्यासाठी तिथे आलं नीलकमल बोटीत चढलं होतं. यामध्ये एका चिमुकल्या मुलाचाही समावेश होता. मात्र बोट दुर्घटनेत तिघांचाही जीव गेला. निधश अहिरे, राकेश अहिरे आणि हर्षदा अहिरे अशी मृतांची नावे आहेत.