कुटुंबीयांना पैसे देण्यासाठी आला आणि अडकला जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:55 AM2019-08-10T00:55:41+5:302019-08-10T00:55:50+5:30
तीन महिन्यांपासून होता बेपत्ता; शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईताला पोलिसांनी अखेर गुरुवारी बेड्या ठोकल्या. आॅनलाईन पैसे पाठविण्याबाबत माहिती नसल्याने, कुटुंबियांना पैसे देण्यासाठी तो स्वत: मुंबईत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. साजीद शेख (४९) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शंभरहून अधिक गुन्ह्याची नोंद असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
तो वांद्रे येथील राहणारा असून त्याच परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपुर्वी मालाडमध्येच राहणारी एक महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी शेखने तिला अडवले आणि ह्यदागिने घालून पुढे जाऊ नका,तिथे चोºया होत आहेतह्ण, असे सांगितले. तेव्हा घाबरून महिलेने सोनसाखळी गळ्यातून काढली. तेव्हा शेख ती घेऊन पसार झाला.
शेखने ही चोरी इतक्या शिताफीने केली की याबाबत महिलेला काहीच समजले नाही. या याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत निशानदार आणि त्यांच्या पथकाने चौकशी सुरू केली.
सतत तीन महिने तपास करुन शेखला वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घराजवळून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेमुळे बारा गुन्ह्याची उकल झाली असून यात मुंबईसह नवी मुंबई आणि पालघरचाही समावेश आहे. शेखला १२ आॅगस्ट, २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन अधिक चौकशी सुरू आहे.
...आणि शेख तावडीत सापडला
पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी शेख हा सतत घर बदलत असायचा. तसेच तो मोबाईलही वापरत नसल्याने त्याचे लोकेशन शोधणे अवघड होते. या दरम्यान त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने तो चोºया करतच होता. त्यामुळे पोलिसांसाठी त्याची अटक हे मोठे आव्हान होते. त्याला त्याच्या कुटुंबियांना पैसे पाठवायचे होते. ह्यआॅनलाइनह्ण ट्रान्सफर कसे करायचे याबाबत त्याला माहिती नसल्याने तो स्वत: पैसे देण्यासाठी वांद्रे परिसरात आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला.
अशी होती कार्यपद्धती?
शेख आणि त्याचे साथीदार मिळून रिक्षा किंवा मोटरसायकलची चोरी करायचे. त्यानंतर त्याच वाहनाने विशेषत: महिलांना टार्गेट करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढायचे.