मनीषा म्हात्रे, मुंबईतीन वर्षांच्या चिमुरडीवर दोघा विकृतांकडून बलात्कार झाला असताना तिच्या कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास स्थानिक गुंडाकडून दबाब आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात पोलीसही आरोपीला वगळून कुटुंबीयांनाच धारेवर धरीत असल्याने कुटुंबीयांना घराबाहेर पडणे कठीण बनल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये समोर आली. या मुलीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेची हमी देणारे पोलीसही अशाप्रकारे दबाव आणत असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न या कुटुंबीयांसमोर उभा ठाकला आहे.मूळची बंगळुरू येथील रहिवासी असलेली तीन वर्षीय चिमुरडी शाळेच्या सुटीत भांडुप खिंडीपाडा येथे राहत असलेल्या नातेवाइकांकडे आली होती. आईवडिलांच्या निधनानंतर खिंडीपाडा परिसरात राहाणाऱ्या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना दोन तरुणांनी तिचे अपहरण करून तिला पार्क केलेल्या रिक्षांमध्ये नेले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिला घरी धाडले. पुन्हा दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी येण्यासही सांगितले. घाबरलेल्या चिमुरडीने झालेला प्रकार दत्तक घेतलेल्या आईला सांगितला. आईने तत्काळ भांडुप पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. पीडित मुलीच्या आईने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. त्यामुळे अनेकदा घरी येऊन स्थानिक गुंडांकडून दम दिला जातो. पोलीसही आरोपीला सोडून घरातल्या मंडळींना गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणत आहेत. शिवाय सायन रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना जाऊ दिले जात नाही. मात्र जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे पीडित मुलीच्या आईने सांगितले. (प्रतिनिधी)
बलात्कारपीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना स्थानिक गुंडाचा धाक
By admin | Published: June 23, 2016 3:48 AM