चार महिन्यांनंतर घडली नातेवाइकांची भेट; जुहू पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून हरविलेल्या मनोरुग्ण महिलेची भेट घडवून आणण्यात शनिवारी जुहू पोलिसांना यश आले. एलआयसी एजंटच्या कार्डमार्फत हा शोध घेण्यात आला असून यासाठी वरिष्ठांकडून पाेलिसांचे कौतुक केले जात आहे.
जुहू परिसरात ८ मार्च, २०२१ रोजी एक मनोरुग्ण महिला फिरत असल्याचा कॉल पोलिसांना आला. त्यानुसार जुहू पोलीस हे जैन मंदिर एस. वी. रोड येथे दाखल झाले. तेव्हा त्यांना एक निराधार मनोरुग्ण महिला सापडली. तिला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्याकडे पोलीस उपनिरीक्षक ढवळे व पथकाने चौकशी केली. मात्र ती महिला स्वतःबाबत काहीच माहिती सांगू शकत नव्हती. त्यामुळे तिच्याकडे असलेली बॅग त्यांनी तपासली. तेव्हा तिच्या बॅगेत मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील पत्ता असलेले एलआयसी एजंटचे व्हिझिटिंग कार्ड त्यांना सापडले. तेव्हा पोलिसांनी एजंटशी संपर्क साधून त्याच्या मदतीने सदर महिलेच्या कुटुंबीयांचा शोध लावला. तेव्हा या महिलेचे नाव आरती कोस्टा असे असून ती जबलपूरची रहिवासी असल्याचे त्यांना समजले. त्यांनी कुटुंबीयांना त्यांची मुलगी सापडल्याचे कळविले. तेव्हा त्या महिलेची आई जयंती कोस्टा व भाऊ शोमित कोस्टा हे जुहू पोलीस ठाण्यात पोहोचले. आरती ही १० डिसेंबर, २०२० पासून जबलपूर येथून हरवली होती. याबाबत जबलपूर येथे तक्रारही करण्यात आली होती. जयंती यांचा जबाब नोंद करून त्यांच्याकडील कागदपत्रे पोलिसांनी तपासली आणि त्यानंतर मनोरुग्ण महिलेला सुखरूप नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले. चार महिन्यांनंतर कुटुंबाची भेट घडविल्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.
.......................................