मुंबई : सांताक्रुझ परिसरात निखिल तिर्लोटकर (२८) याचा मृतदेह मंगळवारी पिशवीत आढळला. त्याची हत्या त्याच्या घरच्यांनीच केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी त्याच्या आईसह पाच जणांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
निखिलच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील प्रकाश तिर्लोटकर बहीण दीपाली, आई ज्योती, भाऊ महेश आणि त्यांच्या घरात भाडोत्री म्हणून राहणाऱ्या रईस अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व सांताक्रुझच्या तिर्लोटकर चाळीत राहणारे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा बेरोजगार होता आणि घरच्यांना तो सतत त्रास द्यायचा. त्याच्या स्वभावाला घरचे कंटाळले होते.
त्याच रागात त्यांनी निखिलची हत्या केली. त्यानंतर, त्याचा मृतदेह मोठ्या पिशवीत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांना अन्सारीने मदत केली. तपासादरम्यान ही बाब उघड झाली. सांताक्रुझचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रय भारगुडे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तिर्लोटकर कुटुंबाची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनीच निखिलला ठार मारल्याचे पोलिसांकडे कबूल केले.आरोपींची रवानगी पोलीस कोठडीतअटक पाचही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांना २९ मे, २०१९पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती सांताक्रुझचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरगावकर यांनी दिली.