- स्नेहा मोरेमुंबई : स्त्री आणि पुरु ष समानतेचा जागर करणाऱ्या समाजात शहरी आणि ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर टाकून पुरु ष मात्र नामानिराळे राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात केवळ २० हजार १५९ पुरु षांनी नसबंदी शस्त्रक्रि या केली आहे. तर त्याच दोन वर्षांत सात लाख ९८ हजार २४७ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. या दोन वर्षांत या शस्त्रक्रियेदरम्यान राज्यभरात २० स्त्रियांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यल्प असण्यामागे गैरसमजुती, मानसिकतेचा अभाव असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.वास्तविक, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत स्त्री व पुरुष दोघांचा समावेश असावा, असे सरकारचे धोरण आहे. पण पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांनाच या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. पुरुष नसबंदीचे प्रमाण त्या तुलनेत खूपच कमी आहे. एकीकडे स्त्रियांपेक्षा सोपी शस्त्रक्रिया असूनही पुरुष शस्त्रक्रिया करण्यास पुढाकार घेत नाहीत. गेल्या दोन वर्षांत स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या १ हजार ५२, तर पुरुषांच्या ८२ शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या आहेत. दोन वर्षांत मुंबईत केवळ १ हजार ९९ पुरुषांनी, तर ४० हजार १४६ स्त्रियांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.हिंगोली, उस्मानाबाद, रायगड, सांगली, सोलापूर, वाशिममध्ये दोन वर्षांत सर्वांत कमी पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. राज्यभरात दोन वर्षांत ७२ पुरुषांना, तर ५२५ स्त्रियांना नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंतीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. दोन वर्षांत एक लाख ६८ हजार ३०६ शस्त्रक्रिया खासगी आरोग्य सेवा संस्थांत झाल्या, तर सहा लाख ५० हजार १०० शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांत झाल्याची नोंद आहे.पुरुष नसबंदीविषयी समाजात अनेक गैरसमजपुरु ष नसबंदीविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. पुरु षांना असे वाटते की, यामुळे आपले पौरु षत्व जाईल. आयुष्यात कधीच मूलबाळ होणार नाही. पुरु ष घरात कर्ता असतो. शस्त्रक्रियेमुळे तो अशक्त होईल. शिवाय महिलांमध्येही शस्त्रक्रियेनंतर वजन वाढण्याची भीती असते. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात यामध्ये काहीही तथ्य नाही.- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोगतज्ज्ञ विभागप्रमुख, जेजे रु ग्णालय
कुटुंब नियोजनाची जबाबदारी ‘ती’च्याच खांद्यावर; दोन वर्षांत केवळ २० हजार पुरुषांनी केली नसबंदी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:37 AM