नाट्यसृष्टीच्या चमचमत्या प्रकाशझोतात न येता, वर्षानुवर्षे रंगभूमीवर योगदान देणारे अनेक रंगकर्मी या क्षेत्रात आहेत. अशा रंगकर्मींच्या मांदियाळीत आनंद म्हसवेकर हे नाव फिट्ट बसते. एकांकिकांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनयापासून मुख्य प्रवाहातल्या नाटकांच्या निर्मितीपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. रंगमंचाची अट न ठेवता सहज करता येणारे व्यावसायिक नाटक, ही संकल्पना त्यांनी रंगभूमीवर रुजवली आहे. ‘सायली - दि वंडरगर्ल’ या त्यांच्या नाटकाच्या निमित्ताने तर आनंद म्हसवेकर यांनी तिहेरी जबाबदारी स्वीकारत, कौटुंबिक नातेसंबंधांचा उत्कट ‘जिव्हाळा’ रंगभूमीवर सादर केला आहे.
या नाटकाच्या शीर्षकावरून काही अंदाज नक्कीच बांधता येत असले, तरी त्याला वळण देत एक वेगळेच नाट्य रंगभूमीवर खेळवले गेले आहे. एकाच कथानकात महत्त्वाच्या विविध विषयांना हात घालत, विचारप्रवृत्त होण्यास भाग पाडणारे हे नाट्य आहे. एका मध्यमवर्गीय घरात घडणाऱ्या या नाट्यात नवरा-बायको, त्यांची शाळकरी मुलगी सायली व आजोबा ही मुख्य पात्रे आहेत. आजोबा हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत; तर सायलीची आई उच्चशिक्षित असून नोकरीसोबतच सक्षमतेने गृहिणीपदही सांभाळत आहे. सायलीचे वडील नोकरीच्या निमित्ताने परदेशी आहेत. अशातच, या घरात एका केअरटेकर आजीबार्इंची ‘एन्ट्री’ होते आणि यातले नाट्य रंगू लागते.
लेखन, दिग्दर्शन व अभिनय असा ‘ट्रिपल रोल’ आनंद म्हसवेकर यांनी या नाटकात पार पाडला आहे. लेखक व दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव परिचयाचे आहेच; मात्र या नाटकातून त्यांच्या अभिनयाची प्रचितीही येते. त्यायोगे, त्यांनी बºयाच कालावधीनंतर भूतकाळाशी संधान बांधले आहे, असे म्हणता येईल. या नाटकाचे संहितालेखन करताना त्यांनी अर्थातच यातल्या ‘सायली’ या पात्राला केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यानुसार, त्यांनी या पात्राला योग्य तो न्याय दिला आहे. परंतु, ही संहिता केवळ एवढ्यावरच थांबलेली नाही; तर याहून बरेचकाही या संहितेत लपले आहे आणि ते रंगमंचावर ठोस दृगोच्चरही झाले आहे. दिग्दर्शक या नात्याने आनंद म्हसवेकर यांनी यातल्या तांत्रिक बाबींचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. पात्रांनाही त्यांनी रंगमंचीय अवकाशात मुक्त खेळवत ठेवले आहे. साहजिकच, संहितेतले नाट्य अपेक्षित परिणाम साधत जाते.
सरळरेषेत मार्गक्रमण करणाºया या नाट्याचा तोल यातल्या कलावंतांनी नीट सांभाळला आहे. यातली आई आणि आजोबा, या दोन पात्रांवर या नाटकाचा डोलारा उभा आहे. यात आईची भूमिका रंगवणारी नीता दोंदे हिला या भूमिकेत अभिनयाचे विविध कंगोरे आविष्कृत करण्यास बराच वाव मिळाला आहे आणि तिने या मिळालेल्या संधीचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. आजच्या काळातल्या आईसमोर असणारे सगळे प्रश्न तिच्यासमोरही आहेत आणि त्यावर तिच्या परीने उत्तरे शोधताना या आईची होणारी कसरत नीता दोंदे या गुणी अभिनेत्रीने उत्कटतेने पेश केली आहे.
आजोबांच्या भूमिकेतले आनंद म्हसवेकर हे या नाटकातले ‘सरप्राईज’ आहे. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक तेच असल्याने त्यांना अभिप्रेत असलेल्या यातल्या आजोबांच्या विविध छटा सादर करण्यात त्यांना आपसूक पाठबळ मिळाले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी असल्याचे; तसेच सद्य:स्थितीत आलेल्या शारीरिक व्यंगाचे बेअरिंग त्यांनी नीट वागवले आहे. नाट्यातल्या प्रत्येक पात्राशी समरस होताना, त्यांनी सादर केलेले विविध आयाम लक्षणीय आहेत. अमृता राजेंद्र या मुलीने लक्षवेधी काम केले आहे.
क्रिया-प्रतिक्रियांचे उत्तम भान तिच्या ठायी आहे आणि भविष्यात तिच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवता येतील. प्रज्ञा गुरव यांनी या घरातल्या केअरटेकर आजीबार्इंची भूमिका आवश्यक ते व्यवधान राखत सादर केली आहे. सुचित ठाकूर व अमित जांभेकर या कलाकारांनी त्यांच्या छोटेखानी भूमिकांमध्ये योग्य ते रंग भरले आहेत. हरेश सोलंकी यांचे नेपथ्य, विनय आनंद यांची प्रकाशयोजना व आशुतोष वाघमारे यांच्या पार्श्वसंगीताने नाटकाच्या आशयाशी एकतानता साधली आहे. ‘जिव्हाळा’ या नाट्यसंस्थेचे हे नाटक, शोकांतिका आणि सुखांतिका या संकल्पनांची कास धरत व कौटुंबिक नात्यांना गवसणी घालत ठोस विचारही मांडत जाते.