Join us

कौटुंबिक वात्सल्य आणि नाती हे आमचे संस्कार, 'त्या' ट्विटवरून मनसेचा दमानियांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 1:39 PM

कौटुंबिक प्रेम हे आमचे संस्कार आहेत हे अंजली दमानिया यांना हे कळणार नाही असे ट्वीट केले आहे. 

ठळक मुद्दे दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात साडे अकराच्या सुमारास दाखल झाले आहेत. सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न असं ट्वीट दमानिया यांनी केलं आहे.

मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचू पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज काही मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास दादर येथील कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यलयाच्या दिशेने रवाना झाले. दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात साडे अकराच्या सुमारास दाखल झाले आहेत. मात्र, यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधत राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असं खोचक ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे. मात्र, त्यांच्या या ट्वीटला मनसेचे माहिम - वडाळा विधानसभेचे प्रभारी यशवंत किल्लेदार यांनी सडेतोड उत्तर देत कौटुंबिक वात्सल्य, कौटुंबिक नाती आणि कौटुंबिक प्रेम हे आमचे संस्कार आहेत हे अंजली दमानिया यांना हे कळणार नाही असे ट्वीट केले आहे. 

राज ठाकरे यांची चौकशी आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी ईडीने पाठविलेल्या नोटीसनंतर स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच संभाव्य आंदोलनाच्या ४ ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि बहीण यांच्या सोबत १०.३० वाजताच्या सुमारास कृष्णकुंजहून ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. अंजली दमानिया यांनाही ट्विट करुन यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीकात्मक ट्वीट केले. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न असं ट्वीट दमानिया यांनी केलं आहे. मात्र, या ट्वीटला सडेतोड उत्तर यशवंत किल्लेदार यांनी दिले आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेअंजली दमानियाट्विटरअंमलबजावणी संचालनालय