निवडणूक पराभवावरून डिवचल्याने कुटुंबीयास लोखंडी दांड्याने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:42 AM2021-05-04T02:42:43+5:302021-05-04T02:43:06+5:30
मकसूद चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हारुण हासमतअली शाह ( ४८ ) हा रविवारी रात्री घराजवळच जमीर, याकूब राईन, हारुण यांच्यासह गप्पा मारत होता
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : शेजारी राहणाऱ्यास त्याचा मामा उत्तर प्रदेशातील पंचायतीच्या निवडणुकीत हरल्यावरून डिवचल्याने संतप्त नातलगांनी डिवचणाऱ्या इसमासह त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यासह घरावर दगडफेक करून दोन दुचाकींची तोडफोड केल्याची घटना रविवारी काशिमीराच्या मुन्शी कम्पाउंडमध्ये घडली.
मकसूद चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हारुण हासमतअली शाह ( ४८ ) हा रविवारी रात्री घराजवळच जमीर, याकूब राईन, हारुण यांच्यासह गप्पा मारत होता. त्यावेळी शाहने याकूबला, उत्तरप्रदेशच्या गावप्रधानाच्या निवडणुकीत तुझा मामा कसा हरला, असे डिवचले. त्याचा राग येऊन याकूबने शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्यावेळी हा वाद जमीर व हारुण यांनी सोडवला. पण त्यानंतरदेखील याकूब शिवीगाळ करत असल्याने शाह यांचा मुलगा समीम याने जाब विचारला. त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकून याकूबचे नातलग सर्फराज राईन, इजाज राईन, युसूफ राईन हे आले व त्यांनी शाहसह त्याची मुले समीम, सलीम, वसीम व शहजाद यांच्यावर जबर हल्ला चढवून ला. शाहजादच्या डोक्यावर टोकदार लोखंडी दांड्याने मारले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
जखमी अवस्थेत शाह व त्यांची मुले पळू लागली असता त्यांच्यावर दगडफेक केली. शाह मुलांसह घरात लपले असता त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून, दरवाज्याच्या जाळीचा पाइप तोडला. घरावर दगड फेकले. शाह कुटुंबाच्या घराबाहेर असलेल्या दोन दुचाकींची तोडफोड केली. पोलीस आल्याने हल्लेखोर पळून गेले. सोमवारी शाह यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी याकूब राईनसह सर्फराज, इजाज व युसूफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.