Join us  

"दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, पुन्हा पाहणी करावी"; शेतकऱ्यांसाठी मनसेनं केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 3:32 PM

मनसेनंही हा प्रश्न घेऊन सरकारला सवाल केला आहे.

मुंबई - महाराष्ट्रात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. परतीच्या पवासानेही ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंतातूर परिस्थिती निर्माण झाली. कधी अवकाळीमुळे त्रस्त झालेला बळीराजा आता दुष्काळ परिस्थीमुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर केला. मात्र, अनेक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आजही दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्या तालुक्यांचं काय होणार, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. मनसेनंही हा प्रश्न घेऊन सरकारला सवाल केला आहे.  

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तूट, घटलेली भूजल पातळी, जमिनीतील आर्दता, खरीप पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या निकषांच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यांमध्ये या सवलती लागू होतील. मात्र, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह अनेक तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही सरकारने दुष्काळ जाही केला नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे. तर, जत तालुक्यात तहसिलदारांची गाडीही फोडण्यात आली होती. आता, या प्रश्नी मनसेनंही नाराजी दर्शवली आहे. 

मनसेचे प्रवक्ता आणि ग्रीन अर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अनिल शिदोरे यांनी काही तालुक्यातील परिस्थिती लक्षात आणून दिली आहे. ''महाराष्ट्र सरकारनं एकूण ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ती यादी पहात होतो. दुष्काळ जाहीर करताना जरा अधिक कडक निकष लावलेले दिसतात. जत, माण, खटाव, केज, कळंब तालुक्यांचा समावेश नाही आश्चर्य वाटलं, असे शिदोरे यांनी म्हटलं आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातही परिस्थिती (उदा. कळमनुरी) काही फार चांगली नाही, त्यातलाही कुठला तालुका नाही.. नांदेड मधलाही नाही. सरकारनं लगेच पुन्हा पहाणी करावी.. ह्यावेळी जरा अधिक सहानभुतीनं, कणवेनं पहावं, असेही शिदोरे यांनी म्हटलं आहे.  

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही दुष्काळ परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, सरकारने सतर्क राहायला हवं, असे म्हटले आहे. त्यामुळे, दुष्काळ जाहीर केल्यानंतर सरकार पुन्हा पाहणी करणार का, हा खरा प्रश्न आहे. 

दुष्काळ जाहीर केल्याने मिळणारे लाभ

- जमीन महसूलात सूट- पीक कर्जाचे पुर्नगठन- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती- कृषी पंपाच्या चालू विजबीलात ३३.५ टक्क्यांची सूट- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी-रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

दुष्काळग्रस्त तालुक्यातील खातेदारांना...

- दुष्काळग्रस्त तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना मिळणार आहे.

- या मदतीचे वाटप खरीप हंगामातील सातबारा पीक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- खरीप हंगामातील पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे ३३ टक्के नुकसान ठरविण्यात येणार आहे.प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांनाही ही मदत मिळणार आहे.

फळपीके व बागायतदारांना..

बहुवार्षिक फळपीके व बागायती पिकांच्या नुकसानाची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामे व सातबारा नोंद आवश्यक असणार आहे. यातील नोंदींनुसार निराकरण महाराष्ट्र जमीन संहितेमधील तरतूदीनुसार करण्यात येणार आहे.

मुलांना पौष्टीक अन्न

दुष्काळ घोषीत करण्यात आलेल्या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत राबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दुष्काळाचे आदेश कधीपर्यंत

दुष्काळाचे आदेश आदेशाच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या निधीसाठी केंद्राकडून मदत मागणार असल्याचे मंत्रीमंडळ बैठकीत सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :मनसेदुष्काळशेतकरी