सुप्रसिद्ध शिल्पकार विठोबा पांचाळ कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:14 AM2017-09-14T04:14:34+5:302017-09-14T04:15:25+5:30
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आणि प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ यांचे मंगळवारी मध्यरात्री बोरीवली येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार आणि प्रकाशचित्रकार विठोबा पांचाळ यांचे मंगळवारी मध्यरात्री बोरीवली येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे़ त्यांच्या पार्थिवावर बोरीवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विठोबा पांचाळ यांनी जवळपास १५ वर्षे महाराष्ट्र फाउंडेशनसारख्या दर्जेदार संस्थेसाठी प्रकाशचित्रणाचे काम केले होते. शिवाय त्यांनी बनवलेल्या कॉम्रेड डांगे यांच्या शिल्पाचे अनावरण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्ली येथील संसद भवनात करण्यात आले होते. नुकतेच त्यांनी रत्नागिरी मालगुंड येथील केशवसुत स्मारकात बसविलेल्या केशवसुतांच्या ‘तुतारी’ या कवितेवर आधारित केलेल्या स्टीलमधील भव्य शिल्पाचे अनावरण करण्यात आले होते. शिल्पकलेबरोबरच छायाचित्रण, चारकोल स्केचेस व कविता हाही त्यांचा व्यासंग होता. साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर यांनीही त्यांच्याबद्दल मृत्युपत्रात लिहून ठेवले होते की, मी गेल्यानंतर जर माझे फोटो प्रकाशित करायचे झाले तर ते केवळ विठोबा पांचाळ यांनी काढलेले फोटोच प्रकाशित करण्यात यावेत’. पांचाळ यांनी वृत्तसमूहांमध्ये गणेशमूर्ती स्पर्धेचे अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम पाहिले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने एक सच्चा व नि:स्पृह शिल्पकार निघून गेल्याबद्दल पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर आणि प्रसिद्धिप्रमुख शिवाजी गावडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.