Join us

मूर्तीच्या डोळ्यात प्राण ओतणार मूर्तिकार गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 6:41 PM

विजय खांतुनी खूप कष्ट करून जे जे मध्ये कला विषयाचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे वडिलांचा मूर्तिकलेचा वारसा त्यांनी जपला. जपला नव्हे समृद्ध केला,दर्जेदार उंचीवर नेला.

ठळक मुद्देमूर्तिकार "आर. व्ही. खातू " असं आमच्या देवीच्या मूर्ती शेजारी पुठ्यावर लिहिलेलं असायचं.लालबागमधल्या तेजुकायाच्या बैठ्या चाळीत खातूंचा गणपतीचा कारखाना. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सतत तीन वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ त्यांनी साकारून सन्मान मिळवला होता.

- मिलिंद प्रधान

सकाळी एक फोन आला. क्षणभर काही सुचेनासं झालं, बातमी ऐकून भूतकाळात गेलो. काही आठवलं," अरे उद्या पाट द्यायला खातूंकडे जायचय..." एका निमिषात तीस पस्तीस वर्षांपूर्वीच चित्र डोळ्यांपुढे उभं राहिलं. आठवणी दाटून आल्या. कारणही तसंच,ती दुर्दैवी अनपेक्षित आणि प्रचंड धक्कादायक बातमी होती विजय खातू गेल्याची.मूर्तिकार "आर. व्ही. खातू " असं आमच्या देवीच्या मूर्ती शेजारी पुठ्यावर लिहिलेलं असायचं. आजही तो पुठ्ठा नजरे समोरून हटत नाही. आर. व्ही. खातू म्हणजे रामकृष्ण विश्वनाथ खातू. खर तर आमच्या देवीची मूर्ती त्यांचे पुत्र विजय खातू घडवीत असत. वयाच्या १४-१५ वर्षी, अगदी लहानपणापासून मूर्तिशास्त्राचे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतले होते. त्यामुळे विजय त्यांच्या वडिलांचे नाव देत असत. लालबागमधल्या तेजुकायाच्या बैठ्या चाळीत खातूंचा गणपतीचा कारखाना. घरगुती गणपतींच्या मुर्त्या बनविण्यात स्वर्गीय रामकृष्ण खातूंचा हातखंडा. अत्यतं बिकट परिस्थीती असूनही ऐन गणपतीत त्याकाळी मूर्तीचे मानधन देता न येणाऱ्या लोकांना रामकृष्ण खातू, " नारळ ठेव आणि मूर्ती घेऊन जा " असं म्हणत. ही विजय खातूंनी सांगितलेली त्यांच्या बालपणीची आठवण. दुकानांचे फलक रंगविण्या पासून पडेल ते काम ते करीत. विजय खांतुनी खूप कष्ट करून जे जे मध्ये कला विषयाचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे वडिलांचा मूर्तिकलेचा वारसा त्यांनीजपला. जपला नव्हे समृद्ध केला,दर्जेदार उंचीवर नेला.२००५ मध्ये अमेरिकेत एका प्रदर्शनात त्यांनी आपल्या कलेचं कौशल्य दाखवलं होत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सतत तीन वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ त्यांनी साकारून सन्मान मिळवला होता.विजय खातू हे जरी गणपतीच्या मुर्त्या बनविण्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांची स्वतःची अशी ओळख म्हणा किंवा कारकीर्द सुरु झाली ती देवींच्या मुर्त्या घडविण्यापासूनच. ते स्वतः हे सांगत असत. सुरुवातीस लालबाग मधील तेजुकायाच्या चाळीत वडिलोपार्जित जागेत, मग चिंचपोकळीच्या महाराष्ट्र व्यायामशाळेच्या शेजारील मोकळी जागा मग पुढे जस जसा या क्षेत्रात त्यांचा विस्तार होऊ लागला तेंव्हा परळ मधील रेल्वे वर्कशॉपचे मैदान भाडयावर घेऊन यांचा कारखाना सज्ज झाला. कारखाना कसला ? कार्यशाळाच ती. अनेक कलाकार त्यांनी याच कारखान्यात तयार केले.गेल्या पाच सहा वर्षांपासून विजय खातूंचा हा कारखाना म्हणजे जणू प्रेक्षणीय स्थळच. असंख्य लोक दूर दूरहुन 'खातूंच्या' मुर्त्या पाहावयास येत असतात.कारखान्यात होणाऱ्या या गर्दीमुळे कामात बऱ्याचदा व्यत्यय येत असतो परंतु खातू लोकांवर कधीच चिडत नसत. मूर्तीचं काम करत असताना अनेक जण त्यांच्यावर कुतुहलापोटी प्रश्नांची सरबत्ती करत पण कामाचा प्रचंड ताण असला तरी ते शांतपणे त्यांना समजून सांगत असत. कला शाखेतील विद्यार्थ्यांची जिज्ञासा जाणून ते त्यांना सतत मार्गदर्शन करीत असत.गणपती वा देवीच्या शरीराची जी काही मूर्तिशास्त्रानुसार रचना असते त्या प्रमाणे ती तशीच मूर्ती घडविण्यात खातूंचा हातखंडा. सर्वात महत्त्वाच म्हणजे मूर्तीची लिखाई, लिखाई म्हणजे मूर्तीचा चेहऱ्या वरील रंगकाम. खूप एकाग्रतेने आणि मोठ्या कौशल्याने ते मूर्तीच्या डोळ्यात प्राण ओतत असत. खातूंचं त्या साठीच लोक नाव घेत. आगमन असो वा विसर्जन, " अरे ही बघ विजय खातूंची मूर्ती " अशी त्यांची ख्याती.मुर्तीची जडणघडण करताना वेल्डरला किती कोन्यात जॉईंट मार हे ते एका नजरेत बघून सांगायचे. ट्राॅलीवरील वीस पंचवीस फुट उंच परातीवर बसुन किंवा मूर्तीच्या पाच पंधरा फूट अंतरा पासून लांब उभा राहून हा माणूस कारागिरांना जे डायरेक्शन द्यायचा ना ते काही औरच असायचं.कारखान्यात आता त्यांचा आवाज ऐकू येणार नाही...उत्सव हे कुटुंबच असत हो. मंडळ-कार्यकर्ते-पदाधिकारी-वर्गणीदार-देणगीदार- हितचिंतक- मंडप बांधणारा-सजावटकार- रोषणाई करणारा- मंडळाचे पुरोहित इत्यादी इत्यादी अशा सर्व घटकांचे हे कुटुंबच असत. या कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे,आमची मूर्ती कधी बनवायला घेणार ? हे नको ते चेंज करा असं आपण ज्याला सांगतो, ज्याची पाठ सोडत नाही त्या देवाला-देवाच्या मूर्तीला घडविणारा,साकारणारा असतो तो मूर्तिकार ! या उत्सव कुटुंब घटका मधला आपल्या हक्काचा एक माणूस.असा हा आपल्या कुटुंबातला माणूस गेला.सुप्रसिद्ध मूर्तिकार मित्रवर्य विजय खातूंना जड अंतःकरणाने आदरांजली !