प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा उद्यापासून
By Admin | Published: April 2, 2015 10:58 PM2015-04-02T22:58:58+5:302015-04-02T22:58:58+5:30
डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी
कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान मानले जात असून ही देवी नवसाला पावते असा लाखो भाविकांचा विश्वास आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील भाविकांबरोबर गुजरात मधील भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. सुरत मधील भाविकांची ही या देवीवर विशेष श्रद्धा आहे. ४ एप्रिल पासून देवीची यात्रा सुरू होत असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षतेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.
वर्षभरात या देवीचे बारसी, नवरात्र यात्रा आदी निरनिराळे उत्सव होतात. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून पंधरा दिवसाची यात्रा भरते हे येथील मुख्य आकर्षण असून यात्रेत ठाणे, पालघर जिल्ह्यातून व गुजरात राजयातून दररोज लाखो भाविक येतात पालघर जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेदरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला होम व त्यानंतर अष्टमीला दुसरा होम असतो. देवीवर आदिवासी समाजाची मोठी श्रद्धा असून आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती आदी समाजाचे भाविक देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. मंदिरात पुजारी हे आदिवासी समाजाचे व सातव्या पिढीचे आहेत. ते श्रद्धेने देवीची पूजा करतात.
महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून देवी डहाणूला स्थायिक कशी झाली याबाबत असे सांगितले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरदऱ्यात जात असताना विश्रांतीची गरज भासू लागली व विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगराच्या शिखरावर गेली व पुढे देवीस भक्तांची आवश्यकता वाटली. येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीस देवीने स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व पूजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने डोंगरावर जाऊन पूजा करू लागले. आणि पुढे देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाली असे महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात नमूद केले आहे.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री १२ वा. पुजारी ध्वज, पूजेचे साहित्य नारळ घेवून वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो व तीन मैलाच्या डोंगरदऱ्याचा रस्ता कापून ३ वा. डोंगरावर चढतो व तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो आणि सकाळी ७ वा. परत येतो. तो ६०० फूट अंतरावर ध्वज लावण्यास जातो. त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. सदर काम वाघाडी येथील मोरेश्वर सातवी परंपरेने करतात.
दरम्यान यात्रेदरम्यान भाविकांच्या सोई सुविधेसाठी पाणी, सुरक्षा रक्षक, दर्शनासाठी, रॅलींग व्यवस्था, सफाई गार्ड आदी व्यवस्था मंदिर ट्रस्टकडून केली आहे.
(वार्ताहर)