Join us

‘डीसी’चे ‘फॅन्स’ झाले भावुक

By admin | Published: April 11, 2016 1:44 AM

डीसी करंटवर धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद होऊन आता एसी करंटवर धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना फायदा होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत आहे

पूजा दामले,  मुंबईडीसी करंटवर धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद होऊन आता एसी करंटवर धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना फायदा होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत आहे. पण, आता ट्रेनने प्रवास करताना येणारा विशिष्ट आवाज, डायमंड आकाराचे पेंटाग्राफ दिसणार नाहीत, याचे दु:ख असल्याची भावना ‘रेल फॅन्स’नी व्यक्त केली. डीसी लोकलच्या आठवणींनी ‘रेल फॅन्स’ भावुक झाले होते. देशात ‘इंडियन रेल्वे फॅन क्लब असोसिएशन’ आहे. या असोसिएशनचे जवळपास ५ हजार सभासद आहेत. मुंबईतदेखील असे अनेक ‘रेल्वेप्रेमी’ आहेत. ‘रेल फॅन्स’साठी रेल्वे हे फक्त दळणवळणाचे साधन नसून त्यांचे ‘प्रेम’ आहे. त्यामुळेच हा रेल्वेप्रवास ते जगतात, अनुभवतात. ‘रेल फॅन्स’साठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक दु:खाचा ठरला. लोकल आता डीसी करंटने धावणार नाही, या विचारानेच अनेकांचे डोळे पाणावल्याची स्थिती झाली होती. डीसी करंटवर धावणाऱ्या शेवटच्या ट्रेनच्या सजावटीसाठी चक्क रेल्वेचे २५ ‘फॅन्स’ शनिवारी सानपाडा कारशेडमध्ये गेले होते. त्यांनी या ट्रेनला सजवले. ज्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून अधिकारी वर्ग प्रवास करणार होता. त्या डब्यात ट्रेनचे जुने फोटो लावण्यात आले. टे्रनची सजावट करायला मिळावी, म्हणून त्यांनी आधीच परवानगी घेऊन ठेवली होती, असे विजय अर्वमुधन यांनी सांगितले. शनिवारी अमेय कुंटे, निखिल करुणाकरण, सुभाष राव, अमोद नेरुरकर, शंतनू कुलकर्णी, हर्षद जोशी कारशेडमध्ये उपस्थित होते. असाच एक रेल्वेचा फॅन अमेय म्हणाला, डीसी करंटवर चालणारी लोकल म्हणजे माझे पहिले प्रेम होते. लहानपणापासून या ट्रेनमधून मी प्रवास केला आहे. आता त्या पूर्णपणे बंद होणार त्यामुळे दु:ख झाले आहे. दुसरे रेल्वे फॅन विजय यांनी सांगितले की, ९० वर्षे कार्यरत असलेल्या रेल्वे आता यापुढे दिसणार नाहीत. याचे अनेकांना दु:ख झाले आहे. रेल्वेवर माझे प्रेम आहे, हे मला लहानपणी कळले होते. पण, नंतर आपल्यासारखा विचार करणारी माणसे आहेत, हे मला कळल्यावर त्यांच्या ग्रुपमध्ये मी सहभागी झालो. मध्यंतरी ग्रे रंगाच्या ट्रेन आणल्या होत्या. पण, या ट्रेनची रंगसंगती पिवळा आणि लाल असावी, असे मी सुचवले होते. अशा अनेक गोष्टी रेल्वे प्रशासनाला आम्ही सुचवत असतो. पण जुन्या लोकलला निरोप देण्याचा प्रसंग खूपच हेलावून टाकणारा होता.