Join us

लोकमत ‘लाईफस्टाईल आयकॉन’ 2020 पुरस्कारांचा शानदार वितरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 2:43 AM

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा, आशय हेच मराठी सिनेमाचे बलस्थान - स्वप्निल जोशी

मुंबई : प्रतिमा कलाकार बनवत नाहीत तर प्रेक्षक ती घडवतात. मी काल, आज आणि उद्या तोच राहणार आहे. डाऊनलोडच्या यादीत देशातील सर्व भाषेत 'समांतर' सातव्या क्रमांकावर आहे. अडीच लाखांहून अधिक वेळा तो डाऊनलोड झाला. लोकांना समांतर आणि त्यातील माझे काम आवडले. तरीही प्रेक्षकांसाठी माझा ‘रिकाॅल’ चाॅकलेट बाॅयचा आहे. लोकांनीच मला चाॅकलेट बाॅय म्हणायचे ठरवले असेल तर ते नाकारणारा मी कोण, असा प्रश्न करत प्रेक्षकांचे प्रेम, आदेश शिरसावंद्य आहे, अशी भावना प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केली.

हाॅटेल सहारा स्टार येथे नुकताच ‘लोकमत लाईफस्टाईल आयकाॅन २०२०’ हा सोहळा पार पडला. कोरोनाच्या काळाच्या निर्बंधांनंतर प्रथमच झालेल्या या शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांना यावेळी लाईफस्टाईल आयकाॅन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वप्निल जोशी यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, लागू बंधू मोतीवाले प्रा. लि.चे दिलीप लागू आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी ‘लोकमत लाईफस्टाईल आयकाॅन २०२०’च्या काॅफीटेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

या पुरस्कार सोहळ्यात ‘लोकमत मुंबई’चे संपादक विनायक पात्रुडकर यांच्याशी संवाद साधताना स्वप्निल जोशी यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. कोरोना काळात ‘ओटीटी’ वर चित्रपट, वेब सीरिज येत आहेत. या नव्या तंत्रज्ञानामुळे नवे दालन उघडले आहे. दोन तासांचे नाटक-सिनेमा आणि पाचशे तासांची मालिका या दोन्हींमध्ये सांगता येईल अशा गोष्टींसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. शिवाय, नाटक, सिनेमा, सीरियल किंवा वेब सीरिज या प्रत्येकाची स्वतःची बलस्थाने आहेत. त्याची तुलना करता येणार नाही. एखाद्या आईला आपण कधी विचारत नाही की तीन मुलात सगळ्यात आवडता कोण? तसेच याबाबत आहे. 

प्रत्येक माध्यमाचे बलस्थान ते ओळखून काम करणे यात कलाकाराची हुशारी सामावल्याचे स्वप्निल जोशी म्हणाले. दाक्षिणात्य सिनेमातील भव्यतेशी मराठी सिनेसृष्टीशी होणाऱ्या तुलनेवर स्वप्निल यांनी भाष्य केले. मराठी सिनेमा हा कथानक, गोष्टीसाठी ओळखला जातो. तिकडे  बाहुबली बनला असेल तर आपल्याकडे श्वास, कट्यार, मुंबई-पुणे-मुंबई बनला. तो तिकडे नाही बनला. दाक्षिणात्य सिनेमात भव्यता आहे म्हणून इकडेही तसेच बनवावे असे नाही. तर कथानकाच्या गरजेवर ते ठरायला हवे, असेही ते म्हणाले.

तर, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. उद्योगांच्या गरजा आणि गरजू तरुणांना पोर्टलच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले. फॅशन, वस्त्रोद्योग, डिझायनर, तंत्रज्ञ अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या, नव्या वाट्या शोधणाऱ्या नवउद्यमींना राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून कामाच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. तर, लवकरच मुंबईच्या कानाकोपऱ्यात विकासाची नवी मॉडेल तयार केली जातील. 

प्रसाधनगृहे, सुंदर वाहतूक बेटे, उद्याने आणि पुलाखाली उचित सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून आपापल्या भागात मुंबईचे सौंदर्य अनुभवता येईल, अशी व्यवस्था उभारण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तसेच रिचमोंड इंडिया ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अभिषेक भास्कर विचारे हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.

टॅग्स :लोकमत