Join us

जेईई मेनमध्ये राज्यात पहिला आलेला 'स्वयं' सोशल मिडियापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:25 PM

कोविड काळ कठीण मात्र संसर्गाची भीती वाटली नाही...

मुंबई : जेईई मेन परीक्षेत राज्यात अव्वल आलेला स्वयं शशांक चुबे दररोज ८ ते १० तास अभ्यासात रमायचा. तो सोशल मिडियापासून दूरच होता. एका अभूतपूर्व परिस्थितीत कोरोना काळात परीक्षा आली. कोविड काळ कठीण गेला मात्र संसर्गाची भीती वाटली नाही...अशा अनेक प्रसंगांचा उलगडा करताना कुटुंबियांचा आनंद द्विगुणित होत होता. 

१ ते ६ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या जेईई में परीक्षेचा निकाल ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जाहीर झाला असून मुंबईकर स्वयं चुबे याने महाराष्ट्रात मुलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. स्वयं ला सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षेत ९८. ६६ पर्सेन्टाईल मिळाले आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या जेईई परीक्षेत ही ३०० पैकी २७६ गुण स्वयंने पटकाविले होते. आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या स्वयंचा भौतिकशास्त्र हा आवडता विषय असून  त्यातच त्याला पुढे करिअर करायचे असल्ल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी दिली.

जेईईमध्ये महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान मिळविणार स्वयं सुरुवातीपासूनच मितभाषी आहेच, शिवाय सोशल मीडियापासून दूर राहणे त्याला अधिक पसंत असल्याचे त्याच्या आई डॉ नैना चुबे यांनी म्हटले. मूळचा दादरकर असणारा आणि बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिक्षण झालेला स्वयं पुढे महाविद्यालय आणि शिकवणीसाठी मरोळ, अंधेरी येथे राहण्यास आले. आई वडील दोघे ही व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांचा स्वयंला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा त्यांनी दिला असल्याची माहिती डॉ शशांक चुबे यांनी दिली. अंधेरीच्या नारायणा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी बारावीचे शिक्षण घेत असताना जेईईची तयारी स्वयं ने केली. परीक्षेसाठी स्वयं ला  पवईचे केंद्र मिळाले होते. पावसाची आणि  गर्दीची सुरुवातीला भीती वाटली मात्र एनटीएने सांगितल्याप्रमाणे केंद्रावरील काळजी आणि सुरक्षितता उत्तम असल्याचे डॉ नैना यांनी नमूद केले.

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन्स परीक्षा होते. यंदा जेईईसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे ११०३१३ विद्यार्थी ७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार होते. विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रमुंबईमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्या