...जशी साहित्याची लंका

By admin | Published: February 4, 2017 03:38 AM2017-02-04T03:38:48+5:302017-02-04T03:38:48+5:30

नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त डोंबिवली क्रीडासंंकुलात भव्यदिव्य अशी पु.भा. भावेनगरी उभारण्यात आली आहे. या साहित्यनगरीची कलात्मकता

... as far as literature is concerned | ...जशी साहित्याची लंका

...जशी साहित्याची लंका

Next

- मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)

नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त डोंबिवली क्रीडासंंकुलात भव्यदिव्य अशी पु.भा. भावेनगरी उभारण्यात आली आहे. या साहित्यनगरीची कलात्मकता पाहून डोळ्यांचे पारणे फिटते आहे. ‘मुंबई गं नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका’, या लावणीची आठवण करून देणारी ‘पु.भा. भावेनगरी बडी बांका, जशी साहित्याची लंका’, अशा ओळी साहित्यरसिकाला सुचल्या नाहीत, तर नवलच.
कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या कल्पनेतून भव्यदिव्य पु.भा. भावेनगरी येथे साकारली आहे. प्रवेशद्वाराला मंदिरे असून त्यात तीन मूर्ती आहेत. त्यात प्रथम तुकोबाराय कीर्तन करतानाचे शिल्प आहे. दुसऱ्या बाजूस ज्ञानेश्वर माऊलींची प्रसन्न मुद्रा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यभागी विद्यापती गणेशाची मूर्ती विराजमान आहे. सध्याचा सेल्फीचा जमाना लक्षात घेऊन आयोजकांनी प्रवेशद्वाराजवळच एक मोठी लेखणी उभारली आहे. आधुनिक युगातही लेखणी म्हणजे हे शाईचे पेनच आहे. त्यात दोन जिने दिले असून लेखणीच्या मध्यभागी जाऊन साहित्यरसिक त्यांच्या मोबाइलमधून सेल्फी टिपत आहेत. तसेच शं.ना. नवरे, आचार्य अत्रे, जात्यावर दळणाऱ्या बहिणाबाई आणि शांता शेळके यांची शिल्पे अत्यंत मोहक स्वरूपात साकारली आहेत. त्या शिल्पासोबतही सेल्फी टिपण्याचा मोह रसिकांना आवरत नाही. मुख्य मंडपात दोन भव्य स्त्री शिल्पे असून ती साहित्यरसिकांचे स्वागत करीत आहेत. संमेलनाचे प्रवेशद्वार बुकशेल्फने सजले आहे. मुख्य स्टेजवर साकारलेल्या शिल्पात पुस्तक उघडलेले असून त्यावर मराठी मनाचा ताबा घेणाऱ्या गाजलेल्या पुस्तकांची नावे कोरण्यात आली आहेत. संमेलन परिसरात फुलझाडे असल्याने संमेलनाच्या अवतीभोवती बागेत फिरल्यासारखे जाणवते.
संमेलनाच्या एका बाजूला लोकसंस्कृतीचे अभ्यासक दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक रा.चिं. ढेरे यांच्या नावाचे ग्रंथग्राम उभारले आहे. तेथे शुक्रवार सकाळपासूच पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात झाली. गुरुवारी प्रकाशक व विक्रेत्यांची थोडीफार गैरसोय झाली असली, तरी ग्रंथदालनास संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळीच सुरुवात झाल्याने प्रकाशक व विक्रेत्यांनी थोडेफार समाधान व्यक्त केले.
संमेलनस्थळी प्रकाशन मंच असून प्रा. धनश्री साने त्याच्या प्रमुख आहेत. संमेलनाच्या तीन दिवसांत या प्रकाशन मंचावर जवळपास १५० पेक्षा जास्त पुस्तके विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. त्याची सुरुवातही सकाळीच झाली. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या ‘संमेलनाध्यक्षांची आत्मकथा’ व ‘संमेलनाध्यांच्या भाषणाची मीमांसा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. केडीएमसीने स्वतंत्र स्टॉल उभारला असून त्याचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर उपस्थित होते. तसेच येथे तीनही दिवस काव्यहोत्र होणार आहे.

गोड शिरा, गुलाबजामचा बेत
व्हीआयपी व प्रतिनिधींसाठी भोजनाचीही स्वतंत्र व्यवस्था आहे. पहिल्या दिवशी दुपारच्या भोजनात गोड शिरा, गुलाबजाम, वरणभात, फ्लॉवर मटारची मिक्स भाजी, छोले, पोळी, पुरी, ताक असा बेत होता. दुपारी भोजनासाठी एकच गर्दी झाली. दुपारी ३ नंतर भोजन संपले. त्यामुळे काही काउंटर बंद करण्यात आले.

प्रतिनिधींनी मांडली व्यथा : आयोजन भव्यदिव्य असले, तरी काही संमेलन प्रतिनिधींनी व्यथा मांडली. रायगडचे विलास मयेकर यांनी संमेलन प्रतिनिधीसाठी तीन हजार शुल्क भरले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मेहुणी आहे. आयोजकांनी त्यांची जेथे व्यवस्था केली आहे, तेथे सोयीसुविधा नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. आयोजकांकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याची ओरड मयेकर यांप्रमाणेच अनेक प्रतिनिधींनी केली. संमेलनाचे कार्यालय संमेलनस्थळीच आहे. तेथे कोणतीही चौकशी करण्यास आलेल्या व्यक्तीला नीट माहिती मिळत नाही. ज्येष्ठांना देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.

Web Title: ... as far as literature is concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.