मुंबईतील किल्ले पर्यटनापासून दूरच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 07:28 AM2018-09-27T07:28:36+5:302018-09-27T07:29:01+5:30
मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील इतिहासही काळवंडला आहे. मुंबईतील शिवडी, वरळी, माहिम या किल्ल्यांकडे प्रशासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे पर्यटनापासूनही ते लाखो मैल दूर राहिल्याचे निदर्शनास आले आहे.
- चेतन ननावरे
मुंबई - मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील इतिहासही काळवंडला आहे. मुंबईतील शिवडी, वरळी, माहिम या किल्ल्यांकडे प्रशासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे पर्यटनापासूनही ते लाखो मैल दूर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अतिक्रमणांच्या विळख्यामुळे या किल्ल्यांसोबत येथील इतिहासही नामशेष होईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.
राज्य पुरातत्त्व विभागाच्या अ वर्गात मोडणाºया वरळी किल्ल्यावर स्थानिकांनी व्यायामशाळा थाटली आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाला लेखी विचारणा केली असता, कोणतेही उत्तर मिळाले नसल्याची प्रतिक्रिया दुर्ग संवर्धनाचे काम करणाºया सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले. रघुवीर म्हणाले की, पुरातन वास्तूंपासून १०० मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे नवे बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र, वरळी किल्ल्याला लागूनच बहुतेकांनी घरे उभारली आहेत. किल्ल्यावरील व्यायामशाळेने अर्धा किल्ला गिळंकृत केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पर्यटनासाठी हा किल्ला मोठा वारसा ठरू शकतो. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या अ वर्गाच्या किल्ल्याची वाताहत सुरू आहे.
सर्वांत भयावह परिस्थितीत उभा असलेला माहिम किल्ला पाहिला, तर हा किल्ला आहे की झोपडपट्टी, असा प्रश्न कुणाही सर्वसामान्यांना पडेल. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण किल्ला हा अतिक्रमणांनी व्यापला आहे.
अतिक्रमणांचा विळखा इतका व्यापक आहे की, कोणतीही व्यक्ती सरळ मार्गाने किल्ल्यात शिरूच शकत नाही. किल्ल्यांतर्गत दोन ते तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. हास्यास्पद बाब म्हणजे, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण करणाºयांविरोधात ३ महिन्यांची कैद आणि पाच हजार रुपये दंडाची पाटी शासनाने लावलेली आहे.
अखेरची घटका मोजणारे किल्ले
वरळी, माहिम, वांद्रे, काळा किल्ला (धारावी किल्ला), रिवा किल्ला, शिवडी किल्ला, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज, बॉम्बे फोर्ट यांपैकी डोंगरी, माझगाव व बॉम्बे फोर्ट कॅसल आता अस्तित्वात नाहीत. उरलेले आठ किल्ले अखेरची घटका मोजत आहेत. शीवचा किल्ला केंद्र पुरातत्त्व विभागांतर्गत असून, माहिम, वांद्रे, काळा किल्ला, शिवडी व सेंट जॉर्ज हे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाकडे आहेत.
इतिहास काय सांगतो?
शिवडी, माझगाव व डोंगर माझगाव डोंगरी व शिवडी हे किल्ले इ. स. १६८९ ला जंजिराच्या याकूत खानाने जिंकले. यात माझगाव किल्ला जिंकल्यावर त्याला १० पेट्या भरून नाणी, दारूगोळा, तोफा एवढी लूट मिळाली. हा किल्ला त्यानंतर त्याने जाळून कायमचा नष्ट केला. इ.स. १७४२ मध्ये मुंबईस वादळाचा मोठा तडाखा बसला होता. त्यात माझगाव किल्ल्याच्या वास्तूवरील छत व छपरे उडून गेली होती.
डोंगरी किल्ला ज्या टेकडीवर होता, तेथे गोºया सोजिरांचे ठाणे होते. पुढे त्याची गरज न राहिल्याने, १७६९ साली फोर्ट सेंट किल्ला बांधला, तेव्हा डोंगरी किल्ला पाडण्यात आला. किल्ल्याची टेकडी नंतर नवरोजी हिल म्हणून ओळखली जायची. कालांतराने समुद्राच्या पाण्याच्या माºयाने हीसुद्धा झिजून गेली.
रिवा किल्ला
इ.स. १६७२ साली जंजिºयाच्या सिद्दीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी जे नवीन किल्ले बांधले, त्यात सायनच्या टेकडीवर असणाºया रिवा किल्ल्याचा समावेश होतो. माहिमच्या खाडीतून चालणाºया व्यापारावर नजर ठेवण्यासाठी व उत्तरेकडून होणाºया पोर्तुगीज व मराठ्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इंग्रज जेरॉल्ड आॅगियरने इ.स. १६७२ मध्ये हा किल्ला बांधला.
वरळी किल्ला
माहिमच्या उपसागरावर पाळत ठेवण्यासाठी दोन बाजूंस दोन किल्ले उभारले गेले. दक्षिणेस वरळी व उत्तरेस वांद्रे. वरळी बेट ही एक लांबलचक टेकडी होती. हा किल्ला २३ जुलै, १६६१ रोजी बांधून झाला, असे स्थानिक नागरिक सांगतात, पण त्याला पुरावा सापडू शकला नाही. कोणाकृती बुरूज व उतरत्या भिंती असलेला हा किल्ला पोर्तुगीज बांधणीचा आहे. मुंबईचा ताबा पोर्तुगीजांकडे होता, म्हणून हे शक्य झाले. पोर्तुगीजांनी हा किल्ला १६७५ मध्ये बांधला आहे.
वांद्रे किल्ला
माहिमच्या खाडीच्या मुख्य प्रवेशामधील महत्त्वाच्या ठिकाणी हा किल्ला बांधला गेला आहे. इ.स. १६४० साली सस्ती बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर वांद्रे किल्ला बांधला आहे. किल्ल्यात पोर्तुगीज शिलालेख पाहायला मिळतात.
शीव किल्ला
माहिम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड आॅगियरने बांधला.
माहिम किल्ला
मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनाºयांना जोडणाºया व माहिमच्या खाडीचे रक्षण करणाºया किल्ल्याला जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ओळखले जाते. इ.स. ११४० मध्ये प्रतापबिंब राजाने माहिमचा किल्ला बांधला आणि आपली राजधानीही तेथेच वसविली. त्या ठिकाणी नाना जातीच्या व नाना प्रकारचे व्यवसाय करणाºया लोकांना बोलावून व्यापार, उदीम, शास्त्र व संस्कृतीची बीजे मुंबई बेटावर रुजवली.
शिवडी किल्ला
१६व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातचा सुलतान बहादूर शहा याच्या ताब्यात हा किल्ला होता. हा सुलतान पिरांचा भक्त असल्यामुळे या किल्ल्याला लागूनच दर्गा बांधण्यात आला. इ.स. १५३४ मध्ये पोर्तुगीजांशी झालेल्या तहात हा किल्ला सुलतानाने पोर्तुगीजांच्या ताब्यात दिला. पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डागडुजी केली.
काळा किल्ला
मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्ल्याला स्थानिक लोक ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखतात. इ.स १७३७ मध्ये मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड आॅन्जीअर याने मिठी नदी काठी किल्ला बांधला, असे येथील शिलालेखावरून दिसून येते. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे पोर्तुगीजांच्या सालशेत बेटावर आणि मिठी नदीवर नजर ठेवण्यासाठी केला गेला.