मीटरप्रमाणे भाडे केवळ कागदावरच
By admin | Published: December 14, 2015 01:36 AM2015-12-14T01:36:35+5:302015-12-14T01:36:35+5:30
पनवेल व सिडको वसाहतीत कुठेही रिक्षा व्यवसायासाठी मीटरचा वापर केला जात नाही. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडे दरावरून वादही होतात.
कळंबोली : पनवेल व सिडको वसाहतीत कुठेही रिक्षा व्यवसायासाठी मीटरचा वापर केला जात नाही. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडे दरावरून वादही होतात. प्रवाशांकडे पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीटरप्रमाणे भाडे आकरण्याबाबतच्या सूचना प्रवाशांकडून करण्यात येत असल्या तरी आरटीओने अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या परिसरात पाच हजारांपेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय करतात. एनएमएमटीने आपली सेवा शहरात सुरू केली असली तरी प्रत्येकवेळी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपयोगी पडतेच असे नाही. परिणामी रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी सातत्याने भाडे मिळत असल्याने मीटरप्रमाणे परवडते. पनवेलमध्ये हे परवडणार नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. त्यातच स्थानिक रिक्षावाले बाहेरच्या रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करू देत नाहीत. त्यामुळे येण्या-जाण्याचे दोन्ही भाडे प्रवाशांकडूनच घेतले जात असल्याचे रिक्षाचालक सांगतात. प्रतिदिनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवासी भाड्याबाबत माहिती असते. मात्र परगावातून आलेल्या प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लुटमार होते. प्रवासी असंघटित आणि रिक्षा व्यावसायिक संघटित असल्याने रिक्षा चालकांचे फावत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. (वार्ताहर)
रिक्षा चालकांचा मनमानी कारभार चालूच आहे. वारंवार आम्ही आरटीओकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही. याकडे आरटीओचे दुर्लक्ष होत आहे.
- अरु ण भिसे, सिटीझन युनिटी फोरम