फरीद तनाशा हत्याकांड : ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:46 AM2018-05-31T02:46:28+5:302018-05-31T02:46:28+5:30

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशाच्या हत्याप्रकरणातील ११ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

Fareed Tanasa massacre: 6 for life and 5 for 10 years of education | फरीद तनाशा हत्याकांड : ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्षांची शिक्षा

फरीद तनाशा हत्याकांड : ६ जणांना जन्मठेप तर ५ जणांना १० वर्षांची शिक्षा

Next

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशाच्या हत्याप्रकरणातील ११ जणांना विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायाधीश एस.एम. भोसले यांनी ६ दोषींना हत्या आणि हत्येचा कट रचणे यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर अन्य ५ दोषींना मोक्काअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
चेंबूरमधील टिळकनगर परिसरात २ जून २०१० रोजी दिवसाढवळ्या राहत्या घरातच फरीद तनाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात फरीदचा जागीच मृत्यू झाला होता. फरीद अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. एका गुन्ह्यात २००५ ते २००८ दरम्यान फरीदला कोठडीची हवाही खावी लागली होती.
फरीद तनाशा, भरत नेपाळी व विजय शेट्टी हे छोटा राजन टोळीचे सदस्य होते. २००९मध्ये राजन टोळीचे वर्चस्व कमी झाले. त्यामुळे नेपाळी व शेट्टी या दोघांनी स्वतंत्र टोळी सुरू केली. २००५पासून अटकेत असलेला तनाशा हा २००९मध्ये जामिनावर बाहेर आला. त्यानेही टिळकनगर परिसरात स्वत:चे बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. तनाशाने आर्थिक फायद्यासाठी टिळकनगर परिसरात चालू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये सहभाग घेऊन विकासक व सोसायटी यांच्यामध्ये तेढ निर्माण केली. यातूनच विकासक दत्तात्रय भाकरेने नेपाळीला तनाशाची सुपारी दिली. यासाठी भाकरेने नेपाळीला ९० लाख रुपये दिले होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ६कडे येताच त्यांनी ११ आरोपींना बेड्या ठोकल्या. या अकराही आरोपींवरील दोष सिद्ध होत त्यांना शिक्षा सुनाविण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने यापैकी जफर खान उर्फ अब्बास, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली; तर रवींद्र वारेकर, विश्वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी उर्फ लालजी यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली.

Web Title: Fareed Tanasa massacre: 6 for life and 5 for 10 years of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.