मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया’ ‘मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात शुक्रवारी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दीड दिवस बाप्पाची विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर शनिवारी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांचे विसर्जन पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन झाले तर, तलाव व चौपाट्यांवरदेखील नियमांचे पालन करीत बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी गर्दी टाळता यावी यासाठी अनेक गणेशभक्तांनी घरच्या घरीच भावपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन केले. अनेक सोसायट्यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दीड दिवसातच आपल्या सोसायटीचा गणेशोत्सव आटोपता घेतला.
सरकारने निर्बंध लागू केल्याने यंदाही विसर्जन मिरवणुकीत ढोलताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली नाही. बाप्पाच्या विसर्जनासाठी दरवर्षी गर्दीने खच्चून भरलेल्या चौपाटी व तलावांवर यंदा मात्र मोजक्या लोकांचीच उपस्थिती होती. यावेळी सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.