कोरोनाचे नियम पाळत दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:38+5:302021-09-12T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : श्री गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर, नैवैद्य दाखविल्यानंतर, पूजा, आरती आणि पाहुण्यांच्या भेटीगाठी नंतर गणपती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्री गणेशाची मनोभावे सेवा केल्यानंतर, नैवैद्य दाखविल्यानंतर, पूजा, आरती आणि पाहुण्यांच्या भेटीगाठी नंतर गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या मुंबईकर गणेश भक्तांनी शनिवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींना साश्रू नयनांनी निरोप दिला. कोरोनाच्या सावटाखाली येथील गणेशोत्सव साजरा होत असल्याने विसर्जन स्थळी गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणेने घेतली होती ; आणि याला जोड म्हणून मुंबईकर गणेश भक्तांनी देखील कोरोनाचे नियम पाळत आपल्या लाडक्या दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
मुंबापुरीत शुक्रवारची रात्र भक्तीपूर्ण वातावरणात न्हाहून निघाली असतानाच शनिवारी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. भक्तांनी बाप्पाची मनोभावे सेवा केली. मुंबईत दुपारपासून दीड दिवसांच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन सुरु झाले. नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळी मुंबई महापालिकेसह पोलीस कर्मचाऱ्यांचा पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला. निर्माल्य वाहून नेण्यासाठी वाहने देखील तैनात करण्यात आली होती.
मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलावांत अधिकाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, अशा आशयाचे आवाहन महापालिका सातत्याने गणेश भक्तांना करत होती. गणेश भक्त देखील पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृत्रिम तलावांत आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करत होते. दुपारपासून सुरु झालेला हा विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत मुंबई शहरासह उपनगरात बहुतांशी ठिकाणी सुरु होता.
नैसर्गिक विसर्जन स्थळी तैनात असलेल्या स्वयंसेवक मार्फत गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात होते. कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणावर केले जात होते. काही ठिकाणी गणेश मूर्ती दान देखील केल्या जात होत्या. गोळा झालेले निर्माल्य महापालिकेच्या वाहनांत टाकून रवाना होत होते. रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तींना निरोप देण्याचा सोहळा मुंबापुरीत रंगला होता.