Join us

साश्रुनयनांनी निरोप ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:05 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. सांताक्रूझ येथील दफनभूमीत त्यांच्या ...

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. सांताक्रूझ येथील दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरूवात झाली. घरापासून काही पावलांवर पार्थिव आणल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे थेट दफनभूमीत नेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्ययात्रेला गर्दी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. दिलीप कुमार यांचे कुटुंबीय आणि काही निवडक व्यक्तींनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.

या सदाबहार अभिनेत्याचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सलामी दिल्यानंतर ‘सुपूर्द-ए-खाक’ हा रिवाज पार पडला. यावेळी दफनभूमी बाहेर गर्दी केलेल्या हजारो चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

दरम्यान, पाली हिल येथील घराबाहेर दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन घेता न आल्याने त्यांच्या चाहत्यांनी सांताक्रूझच्या दफनभूमीकडे धाव घेतली. तेथे तरी त्यांचे शेवटचे दर्शन घडेल अशी अपेक्षा त्यांना होती. पण गर्दी वाढल्याने पोलिसांनी सर्वांना दफनभूमी पासून काही अंतरावर उभे राहण्याची सूचना केली. त्यामुळे चाहत्यांचा पुरता हिरमोड झाला.