मुंबई - राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. मुंब्र्यातील रहिवाशी असलेल्या फरीदा इलियास कुरेशी या महिलेला पश्चिम बंगालमधील पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे, या प्रकरणात लक्ष घालण्याची व मदतीची मागणी मंत्री आव्हाड यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे ट्विटरवरुन केली आहे.
फरीदा कुरेशी या मुंब्र्यातील रहिवाशी असून त्या आपल्या आईला भेटण्यासाठी प. बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र, येथील स्वरुप नगरच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून ममता बॅनर्जींकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच, आपल्या ट्विटरवरुन आव्हाड यांनी फरीदा कुरेशी यांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि पासपोर्टचाही फोटो शेअर केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांना त्यांनी मेन्शन केलं आहे.
दरम्यान, प. बंगाल पोलिसांनी त्यांना का अटक केली किंवा हे नेमकं प्रकरण काय आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. मात्र, आव्हाड यांनी ट्विट केल्यामुळे याप्रकरणाचे गांभीर्या वाढले आहे. त्यामुळे, आता नेमकं हे प्रकरण काय आहे, आणि पोलिसांनी फरीदा यांना का अटक केली ही माहितीही लवकरच समोर येईल. तसेच, ममता बॅनर्जी लक्ष घालून या प्रकरणाचा छडा लावतील का, हेही लवकरच कळेल.