Join us

Farmer Agitation : 'निवडणुकांतील पराभवाच्या भीतीनेच मोदींनी 3 कृषी कायदे मागे घेतले'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 9:42 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशात कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. त्यानंतर, केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे मोदींनी जाहीर केले

ठळक मुद्देपराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

मुंबई - राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. त्यानंतर, देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही मोदींच्या या निर्णयावर मत व्यक्त केलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशात कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. त्यानंतर, केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे मोदींनी जाहीर केले. त्यानंतर, नवाब मलिक यांनी हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील या आंदोलनात शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली, शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. 7 वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

म्हणून 3 कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं. 

टॅग्स :नवाब मलिकनरेंद्र मोदीशेतकरीआंदोलन