लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई आणि राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यांमधील कमाल तापमानाचा पारा वर-खाली होत असतानाच आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवसांसाठी हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागातील अतिरिक्त उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान कमी अधिक फरकाने नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, गडचिरोली, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. येत्या २, ३ दिवसांत विदर्भात मेघ गर्जना, विजा, जोरदार वारे वाहतील. हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.