मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ चा अध्यादेश काढला आहे. मात्र या कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करण्याचा निर्णय चुकीचा असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत असल्याचा आरोप भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सरकारकडून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणुक करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे 94 लाख हेक्टर पीकं गेली. त्यावेळी उद्धव ठाकरे भाजपासोबत सरकारमध्ये असताना गावागावातील शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन 25 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी 50 हजार प्रति हेक्टर देलं पाहिजे असं म्हणत होते. उद्धव ठाकरेंची हीच मागणी आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशमध्ये करत होतो असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
2001 ते 2016 पर्यंतची दीड लाखांची कर्जमाफी याधीच्या सरकारनं केली. मग महाविकासआघाडाचे सरकार कोणाची कर्जमाफी करणार हा प्रश्न असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच भाजपाने कर्जमाफीला निकष लावले म्हणून टीका केली होती. परंतु आता करण्यात आलेल्या कर्जमाफीवर देखील सरकारने निकष लावले आहेत. निकष लावणं आवश्यक आहे. परंतु आम्ही निकष लावले तेव्हा ते चुकीचे होते आणि आता ते बरोबर आहेत असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं म्हणाले होते. मात्र 2 लाखांपर्यत कर्जमाफीची घोषणा करुन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फसवणुक केली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आदर आहे. परंतु काँग्रेसच्या बँका आणि सुतगिरण्या सुटण्याकरता ही कर्जमाफी असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचे अश्रु फुसण्यासाठी गेले होते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करतो असं आश्वासन दिले होते. परंतु कर्जमाफीच्या या योजनेअंतर्गत दिलेलं आश्वासन पूर्ण होताना दिसत नसल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की सरकारने घाईगडबडीत निर्णय न घेता संपूर्ण माहिती घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची गरज होती. अजूनही वेळ गेलेली नाही, पुन्हा विचार करुन कर्जमाफीतच्या योजनेत बदल करण्याची विनंती देखील राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.