ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - राज्यात एकीकडे दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असताना सत्तेत असणा-या भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतक-यांनी जीवन संपवणे म्हणजे फॅशन झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
बोरीवलीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. सर्वंच शेतकरी बेरोजगार आणि उपासमारीला कंटाळून आत्महत्या करत नाहीत असेही शेट्टी म्हणाले. आत्महत्या करणा-या शेतक-यांना कुटुंबाला मदत देण्यावरुनही राज्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे असे शेट्टी म्हणाले. जर महाराष्ट्र सरकार आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत देत असेल तर शेजारच राज्य 7 लाख रुपये देते अस शेट्टी म्हणाले.
महत्वाचं म्हणजे 2 दिवसांपुर्वीच राज्य सरकारनेच जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत राज्यात 124 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली होती.
गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. ' हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, यावरुन भाजपा सरकार शेतक-यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे हे दिसून येत असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.