महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:04+5:302021-02-05T04:23:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नाशिक येथून सुरू झालेला अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा सोमवारी मुंबईत दाखल झाला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाशिक येथून सुरू झालेला अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा सोमवारी मुंबईत दाखल झाला. या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चात तरुण शेतकरी मुले-मुली, महिला व ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग हाेता. हे शेतकरी कसारा घाटमार्गे व नवी मुंबई येथून पायी चालत मुंबईत दाखल झाले. त्यांच्या सोबत ट्रॅक्टर, टेम्पो, जीप इत्यादी वाहने होती. मुंबईलगतच्या शहरी भागात शेतकऱ्यांसाठी अनेकांनी पाणी व अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. मुंबईत दाखल झाल्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळ व गुरुद्वारामधून मदतीचा हात पुढे करण्यात आला.
शेतकऱ्यांना पाणी, जेवण वैद्यकीय मदत या सर्व गोष्टी पुरविण्यात आल्या. आझाद मैदानात शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाल्यानंतर अनेकांनी रात्रभर तेथे वास्तव्य केले. मुंबईत थंडीचा कडाका वाढला असल्याने काही संस्थांनी शेतकऱ्यांना ब्लँकेट व शाल वाटप केले. तर काही शेतकऱ्यांनी आपल्यासोबत आणलेली लाकडे एकत्र करून त्याची शेकोटी पेटवली. रात्रीची विश्रांती घेऊन सकाळ होताच शेतकऱ्यांनी सोबत आणलेली चटणी, भाकर खाऊन मोर्चाची तयारी केली. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांनी वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर केले. तर, मोर्चातील तरुणांनी पथनाट्य, शाहिरी जलसा, विद्रोही गीतांमधून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध केला.
रायगड जिल्ह्यातून दाखल झालेल्या कातकरी आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी पारंपरिक फेऱ्यांच्या गाण्यांमधून केंद्र सरकारचा निषेध करत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला. मैदान व आसपासच्या परिसरातील कचरा शेतकऱ्यांकडून उचलण्यात आला.
................................