Join us

कर्जामुळे शेतकरी बनला चोर, पायधुनी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 2:45 AM

शेतीसाठी घेतलेले १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकरी चोर बनल्याचा धक्कादायक प्रकार पायधुनी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाला.

मुंबई : शेतीसाठी घेतलेले १५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकरी चोर बनल्याचा धक्कादायक प्रकार पायधुनी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाला.दत्तात्रय गरगडे (३७) असे शेतकऱ्याचे नाव आहे. नोकरीच्या शोधात त्याने मुंबईकडील मित्राचा आधार घेतला. मित्र मालकाचे ४० लाख रुपये घेऊन जात असताना, गरगडेने त्यावर डल्ला मारला आणि पैसे घेऊन पसार झाला. मात्र, पायधुनी पोलिसांनी शिताफीने त्याला बेड्या ठोकल्या. मूळचा कर्नाटकच्या कुंदापुरम येथे गरगडे हा पत्नी आणिदोन मुलांसोबत राहतो. शेती हे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. गेल्या काही वर्षांत शेती तसेच घरखर्चासाठी त्याने कर्जघेतले होते. १५ लाखांच्या कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर होता. कर्ज घेण्यासाठी सावकारांनी त्याच्या घराबाहेर रांगा लागल्या.त्या वेळी नोकरीसाठी त्याने मुंबईचा मित्र नाथा नामदेव दवळीचाआधार घेतला. दोघेही जिवलग मित्र होते. दवळी हा एका व्यापाºयाकडे नोकरीला आहे. ९ आॅगस्टच्या रात्री व्यापाºयाने एका व्यवहाराचे ४० लाख रुपये घेऊन येण्याची जबाबदारी दवळीवर सोपविली. दरम्यान, दवळीचा अपघात झाल्याने त्याला स्कूटी चालविणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गरगडेची मदत घेतली. त्याला घेऊन त्याने काळबादेवी येथील व्यापाºयाकडून मालकाचे ४० लाख रुपये घेतले.मात्र पैसे पाहून गरगडेची नियत फिरली. ही रक्कम मिळताच, आपण गावचे कर्ज फेडून स्वत:चा व्यवसाय सुरू करू, असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने पैसे पळवायचे ठरविले. दोघेही स्कूटीवरून पैसे घेऊन मशीद बंदर येथे पोहोचले. तेथे दवळी ओळखीच्या व्यक्तीशी बोलत असताना गरगडेने स्कूटीवरून पळ काढला. दवळीला काही कळण्याच्या आतच, गरगडेने मोबाइल बंद केला. अखेर दवळीने थेट पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी प्रवीण फडतरे, लीलाधर पाटील आणि अंमलदार सोलकर, दळवी, सावंत, सूर्यवंशी, ठाकूर, माने यांनी शोध सुरू केला. मुंबईच्या कानाकोपºयात त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान, तो गावी पळून गेल्याचे समजताच, तपास पथक कर्नाटकला रवाना झाले. तेथून तो नुकताच मुंबईकडे गेल्याची माहिती समोर आली. तो सायन तलावासमोर आल्याची माहिती मिळताच, तपास पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या झडतीत ३७ लाख रुपये सापडले. उर्वरित रक्कम त्याने मित्राकडे ठेवल्याचे समजले. त्यानुसार, ती रक्कमदेखील पोलिसांनी जप्त केली. एकूण ३९ लाख ९२ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

टॅग्स :अटकगुन्हा