शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान भरपाई द्या - आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 07:55 PM2019-11-20T19:55:13+5:302019-11-20T19:58:46+5:30
आशिष शेलार यांनी विद्यार्थी आणि कोळी-मच्छीमारांच्या प्रश्नावर एक निवेदन राज्यपालांना दिले.
मुंबई : शेतकऱ्यांप्रमाणे वादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना मदत करण्याची मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी राज्यपालांकडे केली आहे. बुधवारी आज संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आशिष शेलार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी आशिष शेलार यांनी विद्यार्थी आणि कोळी-मच्छीमारांच्या प्रश्नावर एक निवेदन राज्यपालांना दिले.
यामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील विविध अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश दिले जातात. या कायद्यानुसार प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते. मात्र याबाबतचा निधी अद्याप प्राप्त झाला नसल्याचे शाळा व संस्थाचालकांचे म्हणणे आहे. तरी सदर निधी तातडीने वितरित करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचे निकाल घोषित केले परंतु गुणपत्रिका व पदवीप्रमाणपत्रे अद्याप विद्यार्थ्यांना दिली नसल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बँकींग क्षेत्रातील विविध परीक्षा उत्तीर्ण झाले व मुलाखतीही दिल्या त्यांना या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे त्वरित देण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत. याशिवाय, मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या पेपपमध्ये सर्व्हेयिंग-१ या विषयाच्या पेपरमधील २० गुणांचा एक पर्यायी प्रश्नच दिला नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत संबंधितांना योग्य ती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरूस्ती, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधणे व आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील शाळांमध्ये वीजजोडणीअभावी होणारी गैारसोय टाळण्यासाठी सौर यंत्रणा ( Solar system) बसवण्यासाठी सादिल अनुदानाअंतर्गत ४०० काटींचा निधी देण्याबाबतची कार्यवाही माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती ती वेळीच पूर्ण करून हा निधी शाळांना लवकरात लवकर वितरित करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
याचबरोबर, खारदांडा परिसरामध्ये बहुसंख्येने मच्छीमार बांधव वास्तव्यास आहेत. समुद्रातील वादळांमुळे व अतिवृष्टीमुळे त्यांच्या बोटींचे, मच्छीमारी जाळ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सुकी मासळी पावसामुळे भिजून त्याचेही नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे वरील प्रमाणे प्रचंड नुकसान झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाहणीदौरा मी केला होता त्यावेळी मच्छीमार बांधवांनी शेतकऱ्यांप्रमाणे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई प्रमाणे मच्छीमार बांधवांनाही नुकसार भरपाई देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.