चिरनेर : सिडकोने नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र नयना आणि खोपटे नवनगर अधिसूचित क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पांची काहीच माहिती नसल्याने येथील शेतकऱ्यांना अंधारात ठेवले असल्याचा आरोप जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे.मुंबईच्या क्षेत्रफळापेक्षा २० टक्के अधिक क्षेत्रफळ असलेल्या व भारतातील सर्वात मोठी स्मार्ट सिटीचा विकास आराखडा हा मुंबईच्या डीपी प्लानप्रमाणे का चर्चिला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित करून हा येथील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असल्याचे स्पष्ट करून पूर्वी एमएमआरडीएने दिलेला महापनवेलचा आराखडा रद्द न करता त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे. याबाबत लवकरच एक पुस्तिका काढणार असून सर्व २७० गावांमध्ये बैठका घेऊन याबाबत जनजागृती करणार असल्याचेही भूषण पाटील यांनी सांगितले.सिडकोने अधिसूचित केलेल्या नयना प्रकल्पात उरण तालुक्यात वेश्वी, दिघोडे, कंठवली, पोही आणि रानसई ही ५ गावे मोडत असून खोपटे नवनगर क्षेत्रात वशेणी, सारडे, कडापे, पिरकोन, आवरे, गोवठणे, कोप्रोली, खोपटे, बांधपाडा, कळंबूसरे, मोठीजूई, चिरनेर, विंधणे आदी २५ गावे मोडत आहेत. या गावांमधील रहिवाश्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची सद्यस्थिती समजून घेण्याकरिता सिडकोतर्फे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात मोडणाऱ्या जवळ-जवळ १० हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सिडकोने या गावांचा विकास करण्यासाठी मेसर्स ली असोसिएटस साऊथ एशिया प्रा. लि. यांची नियुक्ती केली आहे. तर घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी मेसर्स ट्रिप या संस्थेची नियुक्ती केली आहे. मेसर्स ट्रिप यांचे सर्वेक्षक या भागातील निवडक घरांना भेट देऊन आर्थिक व दैनंदिन दळणवळणा संदर्भात माहिती गोळा करणार आहेत. सिडको या गावांचा कसा विकास करणार आहे. जमिनीच्या बदल्यात सिडको येथील ग्रामस्थांना कोणता आर्थिक मोबदला देणार आहे, याबद्दल ग्रामस्थांना काहीच माहिती नसल्याने सिडकोच्या या प्रकल्पांना सुरुवातीला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
प्रकल्पांबाबत शेतकरी अंधारात
By admin | Published: July 11, 2015 10:59 PM