Join us

'शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही अन् मंत्री मुंडे डान्सर नाचवतायत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 4:27 PM

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली.

ठळक मुद्देमराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली

मुंबई - परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सपना चौधरी यांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमावरून आता धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. 

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. तसेच, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीवही करून दिलीय. दरम्यान, परळीतील या कार्यक्रमाची आता महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. सोशल मीडियातून या कार्यक्रमाचे फोटोही व्हायरल होत आहेत. 

विनायक मेटेंनीही साधला निशाणा

"परळीत धनंजय मुंडे यांनी सपना चौधरींचा नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयात शनिवारी ११ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. याचं मोठं सावट असताना, याशिवाय शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाही, त्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना सामाजिक न्यायाच्या नात्यानं सपना चौधरींना ठुमके लावायला लावतात. एसटी कामगार आपल्या हक्कांसाठी धरणे आंदोलन करतोय, या प्रश्नावर लक्ष घालायचं सोडून ते सपना चौधरींना ठुमके लावायला लावत आहेत," असे म्हणत शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनीही मुंडेंवर निशाणा साधला.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. अशा गोष्टी टाळता आल्या असत्या तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :बीडधनंजय मुंडेसपना चौधरीनिलेश राणे