...तर कोकणातील शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये, नीतेश राणेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:43 PM2020-02-25T12:43:50+5:302020-02-25T12:59:13+5:30
Nitesh Rane : कर्जमाफीच्या यादीमध्ये कोकणातील एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र या यादीमध्ये कोकणातील एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याने आमदार नीतेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोकणातील १०० टक्के शेतकरी कर्ज भरतात. एनपीए होत नाही. त्यामुळे यापुढे कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असल्यास यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, असा सल्ला नीतेश राणे यांनी दिला आहे.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, यावरुन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
'कर्जमाफीच्या जाहीर झालेल्या यादीत कोकणातल्या एकही शेतकऱ्याला कर्जमाफी दिलेली नाही. कारण, कोकणातील शेतकरी आपली कर्जे 100% भरतात. एनपीए होतच नाहीत. मग, कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय का. यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, असे म्हणत कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय? असे नीतेश राणे म्हणाले.
कर्जाच्या यादीत कोकणातल्या 1 ही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही कारण कोकणात आपले कर्जे 100% भरतात..npa होत नाहीत!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2020
मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय !!
मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये..
तसे ही माफ होणारच आहे..
महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार, 15 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.