- अतुल कुलकर्णी
मुंबई : शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांचा विधानपरिषदेच्या यादीतून पत्ता कट झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सहीचे नवे नाव राज्यपालांना प्रत्यक्ष भेटीत दिले गेले आहे. जुनी अकरा नावे आणि नवीन दिलेले एक नाव अशा बारा नावांच्या यादीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतो, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्वस्त केल्याचे वृत्त आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांसाठीची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. राजू शेट्टी यांचे नाव त्या यादीत देण्याआधी त्यांनी बारामती येथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार यांनी त्यांना आपली शेतीही फिरवून दाखवली होती. दोघांमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शेट्टी यांचे नाव त्या यादीत समाविष्ट झाले होते. दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दोन मोठे मोर्चे काढले .पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यासाठी पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. ५ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर नरसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना एकत्र करून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तीव्र नाराजी पसरली. ज्यांना आपण सरकारमध्ये घेण्याची तयारी दर्शवली आहे, तेच सरकारच्या विरोधात जात असतील तर अशा व्यक्तीला सोबत न घेतलेले बरे अशी चर्चा महाविकास आघाडीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याआधी शरद पवार, उध्दव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यातही यावरून चर्चा झाल्याचे समजते.
शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या वतीने विधानपरिषद देण्यामुळे फायदा किती? आणि त्यांचे नाव वगळण्याचा तोटा किती? यावरही साधक-बाधक चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतरच शेट्टी सोबत असल्याचा फार फायदा नाही आणि ते सोडून गेल्याचे मोठे नुकसान नाही, यावर एकमत झाल्याने नवे नाव राज्यपालांना देण्यात आल्याचे समजते. विधान परिषदेचे माजी सदस्य, राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टाकले यांचे नाव राज्यपालांना देण्यात आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मात्र त्याला कोणीही दुजोरा द्यायला कोणीही तयार नाही. हे नाव चार प्रमुख नेत्यांशिवाय कोणालाही माहिती नाही.
नाव बदलण्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी, तुम्ही तुमच्या कोट्यातून नाव दिले आहे. त्यामुळे कोणाचे नाव ठेवायचे याचा निर्णय तुम्हीच घ्या, असे सांगितले. काँग्रेसनेही त्याला दुजोरा दिला. दरम्यान गुरुवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर बोलताना म्हणाले, पराभूत उमेदवाराचे नाव या यादीत असू नये, अशी माहिती समोर आली आहे. त्याची शहानिशा करणे सुरू आहे. तसे असेल तर वेगळा विचार केला जाईल, असे म्हणत पवार यांनी शेट्टी यांचा पत्ता कट केल्याच्या बातमीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.
राजू शेट्टी यांनी देखील विधान परिषदेत आपल्याला रस नाही असे सांगत, नाव कट झाले तरी आपणच त्यात रस दाखवला नव्हता, असे वातावरण तयार करणे सुरु केले आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांना, त्या भेटीमुळे शेतकरी संघटनेचे व आपले व्यक्तीश: नुकसान होत आहे, असे लक्षात आल्यानंतरच त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधी भूमिका घेणे सुरू केले. त्यातून पुढचे सगळे प्रकरण घडल्याचे एक जेष्ठ नेता म्हणाला.