Join us

शेतकरी कर्जमाफीला 'लॉलीपॉप' म्हणणं अशोभनीय, पवारांची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 3:56 PM

अहमदनगर येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी सांगता महोत्सवानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचा समचार घेतला आहे. काँग्रेस सरकारने तीन राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर, मोदींनी ही कर्जमाफी म्हणजे लॉलीपॉप असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आक्षेप घेत पवारांनी मोदींना लक्ष्य केलं. देशाच्या पंतप्रधानांना ही भाषा शोभत नाही. देशाचे प्रमुख म्हणून त्यांनी केंद्राकडून या राज्य सरकारला मदत करणे गरजेचे होते. मात्र, ते हिणवून बोलत असल्याचे पवारांनी म्हटले. 

अहमदनगर येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी सांगता महोत्सवानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, स्थानिक राजकारणात झालेल्या आघाडीसह, देशातील राजकारण आणि आगामी महाआघाडीवर भाष्य केलं. मोदी सरकारकडून देशातील महत्त्वाच्या संस्थांवर आक्रमण करण्यात येत आहे. आरबीआय, सीबीआय या संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढत असून ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच, सर्वांनी एकत्र येऊन यास तोंड देणे गरजेचं असल्याचं पवार यांनी म्हटलंय. 

काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, देशाचे प्रमुख या कर्जमाफीची खिल्ली उडवतात. या कर्जमाफीला लॉलीपॉप म्हणून हिनवणात, हे देशाच्या प्रमुखांना शोभत नाही. याउलट केंद्र सरकारकडून शेतकरी कर्ममाफी देणाऱ्या या तिन्ही राज्यांना मदत करणे आवश्यक असल्याच पवार यांनी म्हटलं. आगामी पंतप्रधान कोण होणार, या प्रश्नावर पवार यांनी सोईस्करपणे उत्तर दिले. सध्या, सर्वांनी एकत्र येणे गरजेचं असून सत्ता आल्यानंतर एकमताने याचा निर्णय घेण्यात येईल. यापूर्वी 2014 मध्येही अशाच प्रकारे संयुक्त पुरोगामी आघाडीची स्थापना झाल्याचं पवार यांनी सांगितलं.  

टॅग्स :शरद पवारनरेंद्र मोदीशेतकरी