'राजाने आपल्या महालाचे दरवाजे बंद केले'; राकेश टीकैत यांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 02:58 PM2021-11-28T14:58:35+5:302021-11-28T14:58:44+5:30
मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने 'किसान-मजदूर महापंचायत' आयोजित केली आहे. या महापंचायतीत शेतकरी नेते राकैश टीकैत यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
मुंबई: देशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा(SSKM) च्या बॅनरखाली 'किसान-मजदूर महापंचायत' आयोजित केली आहे. या बैठकीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैतदेखील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत एमएसपीच्या मागणीसोबतच स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, बेरोजगारी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
मोदींनी त्यांच्या समितीची रिपोर्ट लागू करावी
यावेळी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी कायद्यावरुन नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दात टीका केली. यावेळी पत्रकारांनी विचारले की, केंद्राने एक समिती स्थापन केली आहे. तुम्ही पुढ येऊन चर्चा करणार का ? त्यावर राकेश टीकैत म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2011मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक समिती स्थापन केली होती. त्यांनी आता त्या समितीची रिपोर्ट लागू करावी. त्यावेळीस मोदींनी वकील बवून या समितीच्या रिपोर्टची बाजू मांडली होती, पण आता हे स्वतः जज झाले आहेत. मोदींनी ती रिपोर्ट लागू करावी, असं टीकैत म्हणाले.
'राजा आपल्या महालाचे दारं बंद करुन बसला आहे'
टीकैत यांनी यावेळी बोलताना नरेंद्र मोदींची तुलना राजाशी केली. त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही हायवे बंद करुन बसला आहात, तुम्ही मागे हटणार का ? त्यावर टीकेत म्हणाले, आम्ही हायवेवर बसलो नाहीत. आमचेच मार्ग बंद केलेत. राजाने(नरेंद्र मोदी) महालाचे दरवाजे बंद केले आहेत. दिल्ली कलीयुगातील महाल आहे, राजाने महालाचे दरवाजे बंद केलेत. आम्हाला फक्त राजाशी चर्चा करायची आहे, असंही ते म्हणाले.
टीकैत यांनी सांगितल्या त्यांच्या मागण्या
यावेळी पत्रकारांनी टीकैत यांना विचारले की, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत ? त्यावर टीकैत म्हणाले की, एमएसपीची गॅरेंटी, आंदोलनात शहीद झालेल्या सातशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे परत घेणे आणि सीड बील लागू न करणे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय, सरकारने आधी पुढाकार घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या, तोपर्यंत आंदोलन मागे होणार नाही. देशभरात आंदोलन सुरुच राहणार, अशी स्पष्टोक्ती टीकैत यांनी दिली.
कृषी कायदे केंद्राकडून रद्द
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हिवळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे कायदे रद्द करण्यासाठी 'कृषी कायदे निरसन विधेयक 2021' लोकसभेत मांडले जाणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचा एक छोटा गटच या कायद्यांना विरोध करत आहे, मात्र सर्वसमावेशक विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जाणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे हे तीन कायदे मागे घेण्याची तरतूद करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेले हे विधेयक कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर मांडणार आहेत.
29 चा ट्रॅक्टर मार्च पुढे ढकलला
संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने 29 नोव्हेंबर रोजी संसदेपर्यंत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. पण, आता हा मोर्चा पुढे ढकलला आहे. तसेच, पुढील रणनीती डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत ठरवली जाईल. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शेतकऱ्यांनी 29 नोव्हेंबरला संसदेकडे ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. पण आता हा मोर्चा तुर्तास रद्द करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची पुढील बैठक 4 डिसेंबरला
शेतकरी नेते दर्शन पाल सिंह यांनी सांगितले की, शेतकरी किसान मोर्चा 4 डिसेंबर रोजी आपली पुढील बैठक घेणार आहे, ज्यामध्ये पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावरील सरकारच्या प्रतिसादाचे विश्लेषण केले जाईल आणि त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल. असे सांगण्यात येत आहे की, शेतकरी किसान मोर्चाने 21 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहा मागण्यांबाबत एक खुले पत्र लिहिले होते आणि त्यात सरकारशी पुन्हा चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे.