Farmers March in Mumbai Live: आंदोलक शेतकऱ्यांचा जत्था आझाद मैदानात दाखल; आज राजभवनाच्या दिशेने निघणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:00 AM2021-01-25T06:00:00+5:302021-01-25T06:00:07+5:30
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा पाठिंबा, किसान मोर्चावर ड्रोनचा वॉच, मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मुंबई : किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जथा इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून मुंबईसाठी निघाला. अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली. १५ हजार शेतकरी कसारा घाट पायी उतरले. त्यानंतर वाहनांतून निघालेल्या आंदोलकांचे कल्याण फाटा, ठाणे शहर व मुंबई शहरात जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत झाल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.
इगतपुरी, शहापूर तालुक्यांच्या अनेक करखान्यांसमोर सीटूच्या कामगारांनी शेतकरी जथ्याचे स्वागत केले. कल्याण फाट्यावर आणि ठाणे शहरात विविध डाव्या संघटना, संस्थांसोबतच शिवसेना नेत्यांनी आंदोलकांचे स्वागत केले. रविवारी सायंकाळी वाहने आझाद मैदानाजवळ पोहोचली. येथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे सुरू झालेल्या महामुक्काम आंदोलनात ते सामील झाले. सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघणार आहे. तिन्ही कृषी कायदे आणि चारही श्रम संहिता रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या आणि शेतकऱ्यांसाठी रास्त हमी भावाचा कायदा करा, या मुख्य मागण्या केल्या जाणार आहेत. तर २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन आणि राष्ट्रगीत गाऊन तसेच शेतकरी-कामगारांचा लढा कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याच्या निर्धारासह कार्यक्रमाची सांगता होईल, असे किसान सभेने स्पष्ट केले. रविवारी या वाहन जथ्याचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकारी आणि विविध डाव्या संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींनी केले.
Almost 15,000 farmers left Nashik & reached here today. More people will come tomorrow & we'll go to Governor's house. Sharad Pawar ji said that he'll come. CM Thackeray has supported us. Leadership of parties in Maharashtra govt will come tomorrow: A Navle, All India Kisan Sabha https://t.co/LbLK6Af3Xepic.twitter.com/fthlOpCN4T
— ANI (@ANI) January 24, 2021
२० हजार कष्टकरी शहापूरमार्गे मुंबईत
कसारा : महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाशिकहून मुंबईकडे लाँग मार्चसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा जत्था शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर घाट्नदेवी येथे मुक्कामी होता. रविवारी २० हजार कष्टकरी सकाळी साडेआठ वाजता घाट्नदेवी ते कसारा घाटमार्गे लतीफवाडी हे १२ किलोमीटरचे अंतर पायी येत शहापूर तालुक्यात दाखल झाले. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
किसान मोर्चावर ड्रोनचा वॉच, मुंबईत कडेकोट बंदोबस्त
प्रजासत्ताक दिनाबरोबर मुंबईत धडकलेल्या किसान मोर्चासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त फाैजफाट्यासह ड्रोनच्या मदतीने या मोर्चावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मोर्चा सोमवारी राजभवनावर धडकणार आहे. रविवारी हा मोर्चा नाशिकहून मुंबईत दाखल झाला आहे. आझाद मैदान येथे राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. या परिसरातही पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे. तसेच एसआरपीएफच्या नऊ तुकड्या त्यांच्या दिमतीला तैनात असून ड्रोनद्वारे सर्व हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून असणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकही घडणाऱ्या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.