'शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे, पण वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत कोणाची बैठक झाली?'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 01:37 PM2022-01-28T13:37:45+5:302022-01-28T13:53:35+5:30

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

'Farmers' names are cute, but who had a meeting with a wine company entrepreneur?', devendra fadanvis | 'शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे, पण वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत कोणाची बैठक झाली?'

'शेतकऱ्यांचं नाव गोंडसपणे पुढे, पण वाईन कंपनीच्या उद्योजकासोबत कोणाची बैठक झाली?'

googlenewsNext

मुंबई - वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे. या निर्णयाला विरोध करत भाजपने सरकारवर जोरदार प्रहार केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर, संजय राऊत यांनीही मलिकांची री ओढली. देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरुन सरकारवर टीका करताना, आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवू देणार नाही, असे म्हटलंय. तसेच, काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

''काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय घेतलेला नाही. काही लोकांनी नव्याने दारुच्या कंपन्या आणि एजन्स्या घेतल्या आहेत. या लोकांच्या भल्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकं कोणाची बैठक झाली, ती कुठे नेमकी झाली. ती बैठक विदेशात झाली का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. म्हणून हा साधा घेतलेला निर्णय नसून यामागे मोठं अर्थकारण आहे, हा अर्थपूर्ण निर्णय आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचं जे स्वप्न सरकारचं दिसतंय त्याचा आम्ही निषेध करतो,'' असेही त्यांनी म्हटले आहे.

ते शेतकऱ्यांचे शत्रू - राऊत

तुमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र होईल असे निर्णय घेतले जाणार होते पण ते आम्ही होऊ दिलं नाही. शेतकऱ्याला चार पैसे मिळणार असतील तर केंद्रानेही असे धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असेही राऊत यांनी म्हटले. 

भाजपा नेत्यांना लगावला टोला

राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. "गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत", असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. 

Web Title: 'Farmers' names are cute, but who had a meeting with a wine company entrepreneur?', devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.