नाट्यसंमेलनातील शेतकरी नटसम्राट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:12 AM2018-06-14T01:12:50+5:302018-06-14T01:13:48+5:30
नाट्यसंमेलन म्हटलं की सेलिब्रिटींना पाहता येईल या अपक्षेने अनेक नाटयरसिक संमेलनस्थळी गर्दी करतात. मात्र मुलुंडच्या प्रियदशर्नी नाट्यसंमेलन नगरीत सोलापूरच्या माढाचा रहिवासी असणारा शेतकरी फुलचंद नाग टिळक सगळ््यांचं लक्ष वेधून घेतोय.
- अजय परचुरे
नाट्यसंमेलन म्हटलं की सेलिब्रिटींना पाहता येईल या अपक्षेने अनेक नाटयरसिक संमेलनस्थळी गर्दी करतात. मात्र मुलुंडच्या प्रियदशर्नी नाट्यसंमेलन नगरीत सोलापूरच्या माढाचा रहिवासी असणारा शेतकरी फुलचंद नाग टिळक सगळ््यांचं लक्ष वेधून घेतोय. नाट्यसंमेलनातील एकपात्री महोत्सवात हा फुलचंद टिळक नटसम्राट साकारणार आहे. आणि ह्या एकपात्री नटसम्राटचे त्यांनी आत्तापर्यंत राज्यभर तब्बल ४५९० प्रयोग केले आहेत. आणि ते ही कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता. आत्तापर्यंत २० नाट्यसंमेलनात या शेतकरी
कलाकाराने हजेरी लावली असून नाटकावरच्या प्रेमापोटी एक सच्चा रंगकर्मी म्हणून दरवर्षी ते नाट्यसंमेलनाला उपस्थित राहतात.
माढामध्ये फुलचंद टिळक यांची साडेपाच एकर जमिन आहे. नाटकावरील प्रेमापोटी फुलचंद हे महाराष्ट्रभर जिथे जिथे एकपात्री महोत्सव असतील किंवा त्यानं कोणत्याही एकपात्री कार्यक्रमाचं आमंत्रण आलं तर पायपीट करत असतात. ह्यात ते कोणत्याही पैशांची आयोजकांकडून अपेक्षा करत नाहीत. मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं असं त्यांनी ठरवलं आहे. नटसम्राट या वि.वा.शिरवाडकर यांच्या अजरामर नाटक त्यांना इतकं आवडतं की हे नाटक त्यांचं संपूर्ण तोंडपाठ आहे.२० अखिल भारतीय नाट्यसंमेलनाबरोबरच त्यांनी २५ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनताही त्यांनी आवडीने भाग घेतलाय. फुलचंद शेती आणि अभिनयासोबतच गाडगेमहाराजांनी मांडलेल्या प्रबोधनाचा प्रचारही सगळीकडे करतात. त्यांचा मायभूमी हा कवितासंग्रही प्रकाशित झाला आहे.
नटसम्राटचे 4590 एकपात्री करणारा रंगकर्मी
आमच्या पंढरपुरात भाविक माऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारी करतात. मी कलाकार आहे आणि कलेवरच्या प्रेमापोटी मी दरवर्षी नाट्यसंमेलनाची वारी करतो. मला माझ्या कामाचा आनंद आहे. गाडगेमहाराजांच्या वेषात फिरून मी त्यांनी समाजाला दिलेल्या शिकवणीचा प्रसार करतो. मला यात एक आत्मिक सुख मिळतं. जोपर्यंत मला जमेल तोपर्यंत मी ह्याचे एकपात्री प्रयोग करणारच.
फुलचंद टिळक,
शेतकरी अभिनेता.