शेतकऱ्यांना अधिकची मदत तसेच पीकविम्याचे पैसे द्यावेत; भाजपाने राज्यपालांना केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:18 PM2019-11-17T15:18:13+5:302019-11-17T15:19:14+5:30
पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले.
मुंबई - अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याच्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करत आहोत. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असून राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अधिक मदतीचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे.
भाजपा महायुती सरकारने राज्यातील शेतीसाठी २३ हजार कोटी रुपयांच्या विम्याचा प्रिमियम भरला असून त्यानुसार शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत करण्यासाठी राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यपालांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज आहे. त्यानुसार राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व केंद्र सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिकची मदत जाहीर करावी. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या २३ हजार कोटी रुपयांच्या पीकविम्यासाठी प्रिमियम भरला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीकविम्याची अधिक मदत मिळणे अपेक्षित आहे. राज्यपालांनी संबंधित पीकविमा कंपन्यांना पाचारण करावे आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविमा द्यावा यासाठी मार्गदर्शन करावे असं त्यांनी सांगितले.
शनिवारी राज्यपालांनी शेतकऱ्यांना तात्पुरती मदतीची घोषणा केली होती. ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली.
नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळबागायती / बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर केलं. या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.