शेतकऱ्यांनी भरली ५११ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:07 AM2021-03-18T04:07:30+5:302021-03-18T04:07:30+5:30
मुंबई : प्रलंबित वीजजोडप्रकरणी तात्काळ कार्यवाही, थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या कृषिपंप वीज जोडणी धोरणाच्या आखणीमुळे आतापर्यंत ५.८१ ...
मुंबई : प्रलंबित वीजजोडप्रकरणी तात्काळ कार्यवाही, थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या कृषिपंप वीज जोडणी धोरणाच्या आखणीमुळे आतापर्यंत ५.८१ लाख शेतकण्यांनी थकीत कृषिपंप वीज बिलापोटी ५११ कोटी ६ लाख भरले आहेत.
राज्यातील ४४ लाख ४४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८५ कोटींची थकबाकी आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे. हे लाभ देऊन सुधारित करण्यात आलेल्या सप्टेंबर २०२० च्या देयकातील सुधारित मूळ थकबाकीवर पहिल्या वर्षी भरल्यास ५० टक्के सवलत आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना ६६ टक्के सवलत आहे.
दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत आहे. गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे.
-------------------
वसूल थकबाकी
पुणे २०१.२० कोटी
कोकण १७२.४८ कोटी
नागपूर ४८.१५ कोटी
औरंगाबाद ८९.४४ कोटी