Join us

Farmers Protests: 'अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की...'; पंतप्रधान मोदींचं मराठीत शेतकऱ्यांना आवाहन

By मुकेश चव्हाण | Published: December 19, 2020 6:57 PM

नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत सर्व अन्नदात्यांना पत्र वाचण्याचे आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली/ मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 25 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना लिहिलेलं पत्र वाचण्याचे आवाहन केलं आहे. 

नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत सर्व अन्नदात्यांना पत्र वाचण्याचे आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विनम्र संवादाचा हा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे. तसेच देशवासियांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

नरेंद्रसिंह तोमर यांचं पत्र मराठीत भाषांतरीत करण्यात आलं आहे. तसेच मराठी बरोबरच इतर प्रादेशिक भाषांमध्येही नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शेतकऱ्यांशी संवादाचा प्रयत्न केला आहे.

नव्या कृषी कायद्यांना विरोध होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. एकूण आठ पानांच्या या पत्रात नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना 'एमएसपी'च्या मुद्द्यावर लेखी आश्वासन देण्याची सरकारची तयारी असल्याचंही म्हटलं आहे. 

केंद्रातील मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या मार्गाने कोणताही भेदभाव न करता सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ६ वर्षांचा इतिहास याचा साक्षीदार आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.  "कृषी कायद्यांमध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे देशाच्या शेती व्यवस्थेचा नवा पाया रचला जाईल. देशातील शेतकऱ्यांना स्वतंत्र करतील, मजबूत करतील. शेतकऱ्यांच्या मोजक्या गटांनी गैरसमज आणि चुकीच्या सूचना पसरवण्याचं काम केलं आहे. ते गैरसमज दूर करणं माझं काम आहे", असं तोमर म्हणाले. 

दरम्यान, आंदोलनाचा 25वा दिवस आहे. हवेत प्रचंड गारठा आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सोयी नाहीत. टिकरी सीमेवर थंडीने गारठल्याने हरियाणाच्या जय सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे बुधवारी बाबा राम सिंह यांच्या आत्महत्येचे दु:ख अनावर झाल्याने जसवीर सिंह या शेतकऱ्यांने स्वत:ला ट्रक्टरखाली झोकून आत्महत्या केली. बाबा राम सिंह यांनी बुधवारी सिंघू सीमेवर स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली होती. शेतकरी इतक्या वेदनेत असतांना केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात नोंदविले होते. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून सिंघू सीमेवर गॅस हीटर लावण्यात आले आहेत. परंतु ते अपूर्ण आहेत व गॅसचा खर्चही शेतकऱ्यांना परवडणारा नाही. 

कोणते आहेत ते तीन कायदे, ज्याचा होतोय विरोध-

1. मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, 20202. आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, 20203. शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, 2020 

टॅग्स :शेतकरी संपशेतकरीनरेंद्र मोदीमराठीमहाराष्ट्र