Join us  

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी मिळेल - देवेंद्र फडणवीस

By admin | Published: June 03, 2017 8:49 PM

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 3 - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील 80 टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात पहिली कर्जमाफी मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 
 
शेतकरी संपासाठी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. शेतक-यांचा संप मिटवण्याऐवजी काही लोकांना संपाचा विषय चिघळत ठेवण्यात जास्त स्वारस्य आहे असा आरोप त्यांनी केला. शेतक-यांचा संप संपूच नये अशी काहीजणांची भूमिका आहे. त्यासाठी ते शेतक-यांच्या आडून राजकारण करत आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 
 
देशातील कोणत्याही राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संपामध्ये आघाडीवर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते राजू शेट्टी यांना माझ्याशी चर्चाच करायची नव्हती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली व राज्यपालांची भेट घेतली पण माझ्याशी चर्चा केली नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
दरम्यान शेतक-यांचा संप मागे घेत असल्याचे जाहीर करणारे किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे," असं जयाजी सूर्यवंशी बोलले आहेत. एबीपी माझाच्या कार्यक्रमात पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जयाजी सूर्यवंशी यांनी हा माहिती देत जाहीर माफी मागितली.